फ्लेक्स लावताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; बेकायदा होर्डिंगला कोणाचे पाठबळ ?
सासवड : पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडीपासून नीरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर होर्डिंग वर्षानुवर्षे उभे असून, यापूर्वी विविध अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर नुकत्याच एका घटनेत महामार्गावरील खळद जवळ होर्डिंग लावताना विजेचा धक्का बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे स्वतः न्यायालयाने संपूर्ण राज्यातील होर्डिंग काढण्याचे आदेश दिले असताना पुरंदर तालुक्यातील बेकायदेशीर होर्डिंगला कोणाचे पाठबळ आहे ?, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भवरसिंग कर्णी दान जी लखावत(वय ४८, रा. कोंढवा रोड, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा रेंदही, ता. सोजत, जि. पाली, राजस्थान) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार १९ रोजी फिर्यादी संपत चंद्रकांत ढवळे यांना सासवड येथील वैभव निकम याने फोन करून पुरंदरमधील खळदजवळ गोटेमाळ येथे मयुरी मिसळचे बाजूला फ्लेक्स बसवायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेतील मयत भवरसिंग कर्णीदान जी लखावत आणि संपत ढवळे हे वैभव निकम सह घटनास्थळी पोहोचले.
तारेला चिकटला आणि जोरदार धक्का
दुपारी चारच्या दरम्यान होर्डिंगवर फ्लेक्स लावण्याचे काम सुरु केले. होर्डिंगच्या दोन्ही बाजूला विजेच्या तारा होत्या. मयत भवरसिंग लोखंडी पाईपला फ्लेक्स बांधून ढवळे यांच्याकडे वरती देत होते. त्याचवेळी हातातील लोखंडी पाईप विजेच्या तारेला चिकटला आणि जोरदार धक्का बसून जमिनीवर पडले. त्यांना तातडीने सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
होर्डिंगचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर
एकूणच पुरंदर तालुक्यातील घटनेवरून महामार्गावरील आणि ग्रामीण मार्गावरील होर्डिंगचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. दोन वर्षापूर्वी मुंबई मध्ये होर्डिंग पडून अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यातील होर्डिंग काढून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते. तसेच खुद्द मुख्यमंत्र्यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून होर्डिंगवर बंदी घातली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सासवड नगरपरिषदेने त्याचवेळी सासवड नगरपालिका हद्दीतील सर्व होर्डिंग काढून टाकले होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होर्डिंग स्पर्धा सुरु झाल्या आहेत. सासवडसह पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर बेकायदा होर्डिंग उभे असल्याचे दिसत आहेत.
रस्ते बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
पुरंदर तालुक्याच्या राष्ट्रीय महामार्गावर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे नियंत्रण आहे. न्यायालयाने होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर सासवड नगरपरिषद स्वतःहून कारवाई करते. मात्र सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग मात्र हे काम आपले नाही, ग्रामपंचायत हद्दीतील आहे, पीएमआरडीए चे आहे असे सांगून जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. त्याचवेळी होर्डिंग व्यावसायिकांकडून अर्थपूर्ण सहकार्य ठेवून होर्डिंग उभे करण्यास परवानगी देताना दिसत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.