पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, हडपसर भागातील बंद बंगला फोडून चोरट्यांनी साडे नऊ लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. बंगल्याची खिडकी उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. हडपसर भागातील मांजरी परिसरात घडली. याप्रकरणी प्रदीप कृष्णा शेवकर (वय ४७, रा. मातोश्री पार्क, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेवकर यांचा मांजरीतील मातोश्री पार्क परिसरात बंगला आहे. सोमवारी सकाळी शेवकर यांची पत्नी, आई आणि मुलगी सकाळी नातेवाईकांकडे गेले होते. शेवकर यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. त्यांचा मुलगा हडपसर भागातील एका शाळेत आहे. मुलाला सकाळी शाळेत सोडून शेवकर भाजीपाला विक्री दुकानात गेले. सोमवारी रात्री शेवकर यांची मुलगी आणि भाची घरी आली. तेव्हा बंगल्याची खिडकीचे गज उचकटल्याचे लक्षात आले.
चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील गंठण, सोनसाखळी, रोकड असा साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कर्मचारी कांबळे अधिक तपास करत आहेत.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.