पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातचं आता खडकी परिसरात दिवाळीनिमित्त कपडे खरेदी करून दुकानाच्या पायऱ्या उतरत असताना महिलेच्या गळ्यातील ४ लाखांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. भरवर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला आहे. गर्दी अन् दुकानाच्या पायऱ्यावर गळ्यातील गंठन हिसकावल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शहरात सोन साखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा चांगलाच उच्छाद वाढल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार दापोडी येथे राहण्यास आहेत. त्या खडकी बाजार येथील खडकी बिजनेस सेंटर येथे कपडे खरेदी करण्यास आलेल्या होत्या. प्रकाश क्लॉथ सेंटर या दुकानात त्यांनी कपड्यांची खरेदी केली. रात्री साडे सातच्या सुमारास त्या दुकानात परत निघाल्या होत्या. दुकानाच्या पायऱ्या उतरत असतानाच पाठिमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्याजवळ येत गळ्यातील ४ लाखांचे सोन्याचे गंठन जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेले.
चोरटा गर्दीतून वाट काढत साथीदारापर्यंत पोहचला अन् दुचाकीवर बसून पसार झाला. महिलेने आरडाओरडा केला, पण चोरटे पसार होण्यात मात्र यशस्वी झाले. ऐन गर्दीत अन् सेंटरमध्ये शिरून चोरट्यांनी महिलेला टार्गेट केल्याने या चोरट्यांचे देखील धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राजगुरू हे करत आहेत.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हीट अँड रन, कोयता गॅंग, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान पुणे पोलीस गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. कडक कारवाई देखील करत आहेत. मात्र अशा गुन्ह्यासोबतच आता सायबर क्राईमचे गुन्हे देखील वाढताना दिसत आहेत. पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून सातत्याने फसवणूकीचे सत्र सुरू असून, दोन महिलांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पद्मावती भागातील ३६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीचे आमिष दाखविले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,असे सांगितले. चांगला परतावा मिळेल या आमिषाने महिलेने चोरट्यांनी सांगितल्यानुसार वेळोवेळी २६ लाख २५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाला, असे भासविले. महिलेने परताव्याबाबत विचारण केली. तेव्हा चोरट्यांनी मोबाईल बंद केले. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.