कौटुंबिक वादातून दोघांना मारहाण
छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात एका टेलर व त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला. यामध्ये मुलाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. ही घटना बुधवारी (दि.8) रात्री सातच्या सुमारास सातारा परिसरात घडली. रियाज शेख, लईक शेख, रेश्मा रियाज शेख, समिना सजाउल्ला शेख, शोएब रईस शेख (रा. सातारा गाव) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात एजाज शहानुर बेग (वय ४०, रा. सादात कॉलनी, सातारा गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दुकानात कपडे शिवत असताना त्यांची मेहुणा रियाज शेख आणि त्यांचा मुलगा लईक शेख हे दोघे दुकानात आले. त्यांनी सोमवारच्या दिवशी कोर्टात का गेलास? असे म्हणत वाद घालत एजाज बेग यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
गावकऱ्यांनी मध्ये पडून फिर्यादीची सुटका केली. यानंतर फिर्यादीची पत्नी जरिना बेग आणि मुलगा जाहेद बेग (वय १८) दुकानाजवळ आले असता रियाज शेख याने जाहेदवर लोखंडी रॉडने चेहऱ्यावर आणि मानेवर प्रहार केला. त्यामुळे तो जमिनीवर पडला. त्यानंतर लईक शेख याने चाकूने त्याच्या हातावर वार केला, तसेच शोएब रईस शेख याने दगडफेक करून जखमी केले.
हेदेखील वाचा : अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला तिघांची बेदम मारहाण; एकाने तर हातातील कड्याने…
दरम्यान, फिर्यादीची पत्नी जरिना बेग यांना रेश्मा रियाज शेख व समिना सजाउल्ला शेख यांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व तिच्या गळ्यातील सोन्याचा पत्ता व मण्यांची पोत हिसकावून घेतली. यानंतर लईक शेख याने लोखंडी रॉडने एजाज बेग यांच्या डोक्यात मारून जखमी केले, तसेच रियाज व लईक यांनी त्यांची दुचाकी (एमएच ०३-सीवाय-६६१३) फोडून नुकसान केले.
हेदेखील वाचा : रेक्टरकडून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण; कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेतील धक्कादायक घटना