चाकू दाखवून लुटणारे दोघे अटकेत
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, चोरी यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना आता चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कृष्णा भास्कर चक्रे (वय ३०, रा. ओमसाईनगर, कमळापूर रोड, रांजणगाव, ता. गंगापूर), गजानन फकीरा जाधव (वय ३२, रा. ओमसाईनगर, कमळापूर रोड, रांजणगाव, ता. गंगापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज येथील बीकेटी कंपनीच्या बाजूला रिकाम्या प्लॉटसमोर दोन संशयित युवक दुचाकीसह थांबले असल्याची माहिती डीबी पथकाचे उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.
हेदेखील वाचा : आयटी इंजिनिअरची सव्वा कोटींची फसवणूक; शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने घातला गंडा
संशयित दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकी, चार हजारांची रोख रक्कम, मोबाइल आणि चाकू असा सुमारे ४९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
‘त्या’ दोघांना सुनावली बुधवारपर्यंत कोठडी
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक प्रविण पाधरकर, दिनेश बन, धीरजलाल काबलिये, जालिंदर रंधे यांच्या पथकाने केली.