
५५ कोटींचे 'ड्रग्ज' जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा (photo Credit- X)
तालुक्यातील डोंगराळ आणि निर्जन परिसर असलेल्या पाचुपतेवाडीत एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने मागील आठ दिवसांपासून ठाणे, सांगली तसेच बिहार येथून साथीदारांना बोलावून ड्रग्जच्या साठवणूक व वितरणाची तयारी केल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. विशेष म्हणजे, या संपूर्ण कारवाईत डीआरआयने स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्वतंत्रपणे माहिती संकलन करून ठोस कारवाई केली.
पाचुपतेवाडी येथील संबंधित शेड हे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मालकीचे असून, ते निर्जनस्थळी असल्याने रात्रीच्या वेळी तेथे कोणाचाही वावर नसतो. याच परिस्थितीचा फायदा घेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा काळाबाजार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शनिवारी दुपारी डीआरआयच्या पथकाने अचानक छापा टाकत १२ किलो द्रवरूप मेफेड्रोन, ९ किलो अर्धद्रवरूप मेफेड्रोन आणि ७५० ग्रॅम स्फटिक स्वरूपातील मेफेड्रोन असा एकूण सुमारे २२ किलो अमली पदार्थांचा साठा जप्त केला.
या कारवाईनंतर सदर मेफेड्रोनचा पुरवठा नेमका कोण करत होता, वाहतूक कोणाच्या माध्यमातून होत होती, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास महसूल गुप्तचर संचालनालयाकडून सुरू आहे. या प्रकरणातून आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.