
फोटो सौजन्य - Social Media
शाळेत उशिरा आल्यास विद्यार्थ्यांना शिक्षा देणे हे बहुतांशी शाळांमध्ये शिस्त लावण्याचा भाग मानला जातो. परंतु काहीवेळा हीच शिक्षा जीवावर बेतू शकते. अशी धक्कादायक घटना वसईजवळील सातिवली गावात घडली आहे. सातिवलीच्या कुवारापाडा परिसरातील श्री हनुमान विद्यामंदिर शाळेत सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षीय काजल गौंड हिला उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी तब्बल १०० उठाबशांची शिक्षा दिली. ही शिक्षा तिच्यासाठी प्राणघातक ठरली. (Vasai News)
शिक्षा घेतल्यानंतर काजलची प्रकृती घरी गेल्यावर अचानक बिघडली. तिला तीव्र वेदना, थकवा आणि चक्कर येऊ लागल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ वसईतील आस्था रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अधिकच ढासळल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी उपचारांचा प्रयत्न केला, पण शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता काजलने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच पालक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून संबंधित शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली. “शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच काजलचा मृत्यू झाला,” असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशी अहवाल लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत चिंताजनक असून अशा प्रकारची कठोर व अवास्तव शारीरिक शिक्षा किती घातक ठरू शकते, याचा पुनर्विचार शिक्षण क्षेत्राने करणे गरजेचे आहे.
ही दुर्घटना शिक्षण व्यवस्थेतील शारीरिक शिक्षेच्या प्रकृतीकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता अधोरेखित करते. एका छोट्याशा चुकीची शिक्षा इतकी मोठी ठरू शकते, याचे हे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण आहे.