दोन परप्रांतीय तरूणांना यवतमाळमध्ये भरदिवसा लुटले;
पुणे: अनैतिक संबंधातील अडखळा ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा गळा दाबून हत्या केली आहे. हत्येनंतर मात्र पतीने आजाराला कंटाळून स्वत:च आपले जीवन संपवले असल्याचा बनाव रचला. शवविच्छेदन अहवालानंतर हा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तीच्या प्रियकराला अटक केली आहे. दरम्यान जबरी चोरीचा बनाव करून पतीचा प्रियकरामार्फत खून करण्याचा प्रकार नुकताच वारजेत घडला होता. दरम्यान पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोपीनाथ इंगुळकर हे मार्केटयार्डात हमाली करत होते. त्यांना मधुमेहाचा तसेच मणक्याचा त्रास होता. पत्नी राणी हिने २३ तारखेला गोपीनाथचा भाऊ संभाजी यांना फोन करुन गोपीनाथ घरात बेशुध्दावस्थेत पडल्याची माहिती दिली. संभाजी घरी दाखल झाल्यावर तिने गोपीनाथ मधुमेह आणि मणक्याच्या त्रासाला कंटाळले होते. यामुळे ते स्वत:चा गळा दाबून आत्महत्येचा प्रयत्न करत होते अशी माहिती दिली. संभाजी यांनी गोपीनाथ यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे मृत घोषीत केल्यावर शवविच्छेदन केले. गोपीनाथ यांचा मृत्यू गळा दाबला गेल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी राणीला बोलावून घेत चौकशी केली, तेव्हा तिने गोपीनाथ मणक्याच्या त्रासाने वैतागले होते, ते नेहमी मला मारुन टाका असे सांगायचे. घटनेच्या दिवशी त्यांनी माझा हात हातात घेऊन स्वत:चा गळा दाबून घेत जीवन संपवले असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यांनी अधिक चौकशी करता, राणीने तीचा प्रियकर नितीन यास घरी बोलावून पतीचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली.
गोपीनाथची हत्या झाली तेव्हा त्याची दहा वर्षाची मुलगी घरीच होती. घटनेमुळे ती खूप घाबरली होती, गोपीनाथचा गळा दाबत असताना ती घाबरून स्वयंपाक घरात लपून बसली होती. नितीन हा राणीचा नातेवाईकच असून तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी राणी गोपीनाथ इंगुळकर ( ३२, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज) आणि नितिन शंकर ठाकर ( ४५, रा. कुरण, ता. वेल्हा) यांना अटक केली आहे. गोपीनाथ बाळु इंगुळकर ( ३७, रा. दुगड शाळेजवळ, सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ संभाजी बाळु इंगुळकर ( ४४, रा. वृंदावन कॉलनी, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.