टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; 'त्या' महिला शेतात आल्या अन्...
शिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात आता टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील उचाळे वस्ती येथील महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्पना बारहाते असे या महिलेचे नाव आहे.
कल्पना या शेतात पिकांना पाणी देत असताना देविदास बारहाते यांच्यासह काही महिला हातात कुऱ्हाड, फावडे घेऊन शेतात प्रवेश करुन कल्पना यांच्याजवळ आल्या. त्यांनी कल्पना यांना ‘तू शेतात पिकांना पाणी द्यायचे नाही, तुझ्याकडे बघावे लागेल’, असे म्हणून दमदाटी करत कल्पना यांना जमिनीवर पाडून कुऱ्हाड, फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण करत जखमी केले.
याबाबत कल्पना योगेश बारहाते (वय ३६, रा. उचाळे वस्ती टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी देविदास मारुती बारहाते, अंजली देविदास बारहाते, बारकूबाई नारायण बारहाते, रंजना हरिभाऊ बारहाते (सर्व रा. उचाळे वस्ती, टाकळी हाजी, ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
दुचाकीस्वार तरुणासह मित्राला बेदम मारहाण
दुसऱ्या एका घटनेत, किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि साथीदारांनी दुचाकीस्वार तरुणासह मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय राजन लोणकर (वय २९, रा. विठाई पार्क सोसायटी, कसबा पेठ), ललित आढाव (वय २४, रा. कसबा पेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रिक्षाचालक सचिन महादेव मिसाळ (वय ४८ ,रा. कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे.