
Police Molestation Case: ‘चल येते का...’ म्हणत महिलेची छेड; कर्जतमध्ये पोलिस कर्मचाऱ्याविरोधात संताप, नेमका प्रकार काय?
रविवारी (१३ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार महिला तिच्या बहिणीसोबत कर्जत बाजारातून गुंडगे येथे घरी जात होती. कर्जत ऑक्ट्रॉय नाक्याजवळील रेल्वे पुलाच्या परिसरात दोन जणांनी त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यातील एकाने महिलेला उद्देशून ‘चल येते का चल’ असे म्हणत तिची छेड काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर महिलेने आपल्या पतीला माहिती दिली. त्यानंतर पती घटनास्थळी आला. त्यावेळी संबंधित दोघांची ओळख पटली. यातील प्रमोद मारोती पाटील (रा. भिसेगाव) हा पोलिस कर्मचारी असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत महेंद्र भगवान भंडारे (रा. गुंडगे) हा असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, महिलेच्या बहिणीने या प्रकाराचा व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येते. हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पोलिस कर्मचारी असलेल्या आरोपीने दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
घटनेनंतर महिला आणि तिचे कुटुंबीय कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, संबंधित पोलिस कर्मचारी हा डीवायएसपींच्या ताफ्यात असल्याने सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. यामुळे परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले.
हेही वाचा:स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप
तक्रारीवर तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी सुमारे २० ते ३० ग्रामस्थ पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यांनी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या दबावानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास अखेर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७५(३), ७८ आणि ७९ अंतर्गत प्रमोद पाटील आणि महेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यावरच महिलेची छेड काढल्याचा आरोप झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू असून, संबंधित प्रकरणात पुढील पोलिस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.