
Delhi Air Quality : राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; AQI मध्ये घसरण, पण सोमवारपर्यंत...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरी देखील सोमवारपर्यंत दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचेही म्हटले जात आहे. शुक्रवारी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली. शुक्रवारी सकाळची सुरुवात हलक्या धुक्याने झाली.
दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याची चादरही पाहिला मिळाली. ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली. सफदरजंग विमानतळावर ८०० मीटर दृश्यमानता नोंदवली गेली. दिल्लीत दिवसभर लोक मास्क घालताना दिसले आणि श्वसनाच्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ३६४ नोंदवला गेला, जो अत्यंत खराब श्रेणीत येतो. गुरुवारच्या तुलनेत ही २७ अंकांची घसरण दर्शवली. तर दुसरीकडे, गाझियाबाद एनसीआरमध्ये सर्वात प्रदूषित हवा राहिली, जिथे ४२२ चा AQI नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीत येतो.
हेदेखील वाचा : Delhi NCR Air Pollution: राजधानीत प्रदूषणाचा कहर! दिवाळीमुळे दिल्ली-NCR मध्ये AQI ३३५, प्रदूषणामुळे नागरिकांची वाढली चिंता
दरम्यान, नोएडामध्ये ३९४, ग्रेटर नोएडामध्ये ३५३ आणि गुरुग्राममध्ये २८७ अशी एक्यूआय नोंदली गेली. फरिदाबादची हवेची गुणवत्ता सर्वात स्वच्छ होती, २३८ च्या एक्यूआयसह, ती खराब श्रेणीत येते.
सोमवारपर्यंत हवेची गुणवत्ता घसरेल
सोमवारपर्यंत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहील. यामुळे श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सीपीसीबी) करण्यात आले.
व्यावसायिक वाहनांवर दिल्लीत बंदी
राजधानी दिल्लीत प्रदूषण वाढताना दिसत आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एक नोव्हेंबरपासून राजधानीत प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. ‘एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन’ने (CAQM) हा निर्णय घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणीही होत असल्याचे दिसत आहे.