अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' ला दिल्ली निवडणुकीत मिळणार इतक्या जागा?, प्रचाराच्या तोफा थंडावल्या
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता मतदान आणि निकालाकडे लक्ष असणार आहे. दिल्लीवर पुन्हा कोण सत्ता गाजवणार हे येत्या ५-६ दिवसात समोर येईलच, पण त्याआधी आम आदमी पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज अरविंद केजरीवाल यांनी वर्तवला आहे. निवडणुकीत ‘आप’ला ५५ जागा मिळत आहेत. मात्र जर माता आणि भगिनींनी कठोर परिश्रम केले तर पक्षाला ६० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, “भाजपवाले दावा करत होते की आपला नवी दिल्ली, जंगपुरा, कालकाजी या तीन जागा कठीण जाणार आहेत. पण लक्षात ठेवा, आप या जागा ऐतिहासिक फरकाने जिंकणार आहे.”
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणि त्याआधी आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांनी सोमवारी एक व्हिडिओ जारी करून काही मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाने भाजप आणि त्यांच्या “गुंडांच्या” “दुष्कृत्ये” आणि “निवडणुकीतील गैरप्रकार” रेकॉर्ड करण्यासाठी झोपडपट्टी भागात स्पाय कॅमेरे आणि बॉडी कॅमेऱ्यांचं वाटप केलं आहे.
आप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे तर भाजप त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पराभवाकडे वाटचाल करत आहे. या कारणास्तव भाजप चुकीच्या पद्धतींचा अवलंब करत आहे. केजरीवाल यांनी आरोप केला की भाजप कार्यकर्ते झोपडपट्टीवासीयांना ३,००० ते ५,००० रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या बोटांवर शाई लावू इच्छित होते जेणेकरून त्यांना मतदान करण्यापासून रोखता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना आवाहन केले की जर त्यांनी त्यांना पैसे दिले तर ते घ्यावेत पण त्यांच्यावर शाई लावू देऊ नये. जर भाजप सत्तेत आला तर ते झोपडपट्ट्या पाडतील, असा इशारा त्यांनी झोपडपट्टीवासीयांना दिला. त्यांनी इशारा दिला. याला तोंड देण्यासाठी, ‘आप’ने ‘क्विक रिस्पॉन्स टीम्स’ तयार केल्या आहेत जे १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचून असंवैधानिक कृत्ये थांबवतील आणि गुन्हेगारांना पोलिसांच्या ताब्यात देतील. मात्र केजरीवाल यांच्या आरोपांवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया सध्या तरी आलेली नाही.