दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना मोठा धक्का
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका सुरु आहेत. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले तर आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. असे असताना आता काही महिन्यांतच दिल्ली विधानसभा निवडणूकही घेतली जाणार आहे. या निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. दिल्लीचे परिवहनमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश गेहलोत यांनी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
संबंधित बातम्या : संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी? निवडणूक आयोगाकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार
कैलाश गेहलोत यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्रच केजरीवाल यांना दिले आहे. यामध्ये ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. राजीनाम्यात त्यांनी यमुना नदी साफसफाई आणि केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. गेहलोत म्हणाले की, ‘आम्ही गेल्या निवडणुकीत यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. पण आम्ही यमुना नदी स्वच्छ करू शकलो नाही’.
बंगल्याचाही होता उल्लेख
अरविंद केजरीवाल यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “नवीन बांगलासारखे अनेक लाजिरवाणे आणि विचित्र वाद आहेत. यावरून अनेकांमध्ये शंका निर्माण होत आहे. जर दिल्लीने आपला बराचसा वेळ केंद्राशी लढण्यात घालवला तर माझ्याकडे ‘आप’शी फारकत घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही : गेहलोत
या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘मी तुमच्यासोबत हेही सांगू इच्छितो की, आज पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत, त्याच मूल्यांच्या आव्हानांनी आम्हाला एकत्र आणले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा जनतेला दिलेल्या वचनबद्धतेच्या पलीकडे गेल्या आहेत आणि अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत. ज्या यमुनाला आपण स्वच्छ नदी बनवण्याचे वचन दिले होते, पण ती कधीच करू शकलो नाही, ती आता पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे.
आम्ही केवळ आमच्या राजकीय अजेंडासाठीच लढतोय
कैलाश गेहलोत यांनी ‘आप’वर मोठा आरोप करत म्हटले की, ‘आणखी एक क्लेशदायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आम्ही केवळ आमच्या राजकीय अजेंडासाठीच लढत आहोत. त्यामुळे येथील जनतेला मूलभूत सेवाही देणे कठीण झाले आहे. दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आहे आणि मला असेच चालू ठेवायचे आहे, म्हणूनच माझ्याकडे कोणत्याही पक्षाशी फारकत घेण्याचा पर्याय नाही आणि मी प्राथमिक पदाचा राजीनामा देत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.