Ajit Pawar and Prakash Ambedkar meet
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 23 नंतर राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार असून जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. प्रचारसभा बरोबरच राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आता अजित पवार व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे आणि परिमाणी महाविकास आघाडीसोबत युती होती. मात्र जागावाटपामध्ये चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला आहे. असे असताना बारामतीमध्ये प्रतिष्ठेची लढाई लढत असलेल्या अजित पवार यांच्यासोबत अजित पवार यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत.
हे देखील वाचा : Ajit Pawar म्हणाले, ‘त्यांच्यासारखे मोठे नेता’…PM मोदी करणार नाहीत बारामतीत प्रचार
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पुण्यातील रुग्णालयामध्ये त्यांना छातीमध्ये दुखू लागल्यामुळे दाखल करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी करण्यात आली आहे. सध्या ते पुण्यातील निवासस्थानी असून आराम करत आहेत. अजित पवार हे देखील निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे दौऱ्यावर होते. यामुळे अजित पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाली असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणूक देखील पवार कुटुंबामध्ये होणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचाच पुतण्या लढत देणार आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कुटुंबामध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे सर्वजण राजकीय समीकरणे जुळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर व अजित पवार यांच्या भेटीने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.