खेड तालुक्यातील लढत विकासाच्या मुद्द्यावर; 'निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो'; अजित पवारांचे आश्वासन
राजगुरूनगर : चाकण शहरात जिल्हा रुग्णालय, नर्सिंग कॉलेज,पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी हॉस्पिटल यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच प्रत्यक्षात कामे देखील सुरु झाली आहेत. ही सर्व कामे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांना तुम्ही निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो, असे जाहीरसभेत सांगितले आहे.
हेदेखील वाचा : माहीम मतदारसंघातील वादावर अखेर पडदा; सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार, भाजप अमित ठाकरेंचा करणार नाही प्रचार
तालुक्याला चालून आलेली मंत्रिपदाची संधी तसेच चाकणचा पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासारखा विकास करण्यासाठी आम्ही दिलीप आण्णासोबतच असल्याची ग्वाही चाकण येथील नागरिकांनी दिली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने गाठीभेटींना चाकण परिसरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चाकण शहरातील व्यापारी, व्यवसायिक, ग्रामस्थ यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मोहिते पाटील यांना चौथ्यांदा आमदार करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपा जिल्हाध्यक्ष शांताराम भोसले, शिवसेना जिल्हा समन्वयक अक्षय जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच चाकण शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिते-पाटलांनी साधला आडत्यांसोबत संवाद
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजार आवारातील व्यापारी, आडते, मापाडी शेतकरी याच्याशी संवाद साधला. त्यांनी देखील सोबत असल्याची ग्वाही दिली.
मावळमध्येही प्रचारात चांगलीच रंगत
मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली असून, आमदार म्हणून निवडून देण्याचा विश्वास ठिकठिकाणी मतदारांकडून देण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या गावभेटीमध्ये तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा भेगडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने बापूसाहेब भेगडे यांचे पारडे दिवसेंदिवस अधिक जड होत चालले आहे.
विक्रमी मताधिक्य नक्कीच मिळेल
दरम्यान, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता सोबत असल्याने नक्कीच विक्रमी मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वतःला उमेदवार समजूनच काम करत आहेत, असे मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी म्हटले आहे.