ट्रम्प यांच्या विजयानंतरही कमला हॅरिस बनू शकतात अमेरिकेच्या अध्यक्ष?
अमेरिकेच्या जनतेने अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा निवडून दिलं आहे. कमला हॅरिस या राष्ट्रध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या मात्र त्यांना मात देत ट्रम्प दुसऱ्यांदा विजयी झाले. मात्र अमेरिकेच्या निवडणुकीतील चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ट्रम्प विजयी झाले असले तरी त्यांच्या या विजयावर विरजण पडू शकतं. २०१६ च्या निवडणुकीत स्वत: ट्रम्प यांना ३० लाख कमी मतं मिळूनही राष्ट्राध्यक्ष बनले होते. आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की भारतात तर अशी राजकीय व्यवस्था नाही मग अमेरिकेत अशी कोणती व्यवस्था आहे जी पराभूत उमेदवारालाही राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी देते, जाणून घेऊया…
अमेरिकेत पॉप्युलर मतदान म्हणजे इलेक्टोरल कॉलेज मतदान असे दोन प्रकार आहेत. पॉप्युलर वोट म्हणजे देशाची जनता थेट आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करते आणि इलेक्टोरल कॉलेजमध्ये 538 इलेक्टर्स असतात. प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येनुसार काही इलेक्टर्स दिले जातात. हे इलेक्टर्स त्या राज्यातील संसदीय प्रतिनिधींच्या (हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह्स आणि सीनेट) संख्येवर आधारित असतात. वॉशिंग्टन डीसीला देखील 3 इलेक्टर्स आहेत. आता इलेक्टोरल कॉलेजचं मतदान डिसेंबरमध्ये होणार असून अधिकृत निकाल ६ जानेवारी रोजी समोर येणार आहे.
अमेरिकेच्या राजकारणात याआधीही अशी परिस्थिती अनेकवेळा निर्माण झाली आहे. एखाद्या उमेदवाराला पॉप्युलर वोटमध्ये हार स्वीकारावी लागली असली तरी, इलेक्टोरल कॉलेजमध्ये त्याला बहुमत मिळालं आहे. 2016 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याही बाबतीत असंच घडलं होतं. त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलिरी क्लिंटन यांच्यापेक्षा जवळपास 30 लाख कमी मतं मिळाली होती तरीही ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले होते.
इलेक्टोरल कॉलेज म्हणजे अमेरिकेच्या प्रत्येक राज्यासाठी नियुक्त केलेल्या निवडलेल्या इलेक्टर्सचा एक गट आहे. जेव्हा अमेरिकेचे नागरिक निवडणुकीत मतदान करतात, तेव्हा ते थेट उमेदवाराला मतदान करत नाहीत, तर त्या उमेदवाराच्या प्रतिनिधी असलेल्या इलेक्टर्सच्या गटाला मतदान करतात. मतदान झाल्यानंतर एक महिन्यांनंतर डिसेंबर महिन्यात हे इलेक्टर्स मतदान करतात आणि इलेक्टर्सने निवडलेल्या उमेदवाराला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
इलेक्टर्सची संख्या कोणत्याही राज्याच्या सिनेट आणि प्रतिनिधी सभेतील सदस्यांच्या प्रमाणानुसार असते. अमेरिकेतील ५० राज्ये आणि वॉशिंग्टन डीसीच्या इलेक्टर्सची एकूण संख्या ५३८ आहे. त्यामुळे राष्ट्रपती होण्यासाठी एखाद्या उमेदवाराला किमान २७० इलेक्टर्सचा पाठिंबा मिळवावा लागतो.
मॅन आणि नेब्रास्का या दोन राज्यांव्यतिरिक्त सर्व राज्यांमध्ये इलेक्टर्ससंदर्भातील नियम एकसारखा नियम आहे. जर एखादा उमेदवार एखाद्या राज्यात पॉप्युलर वोटमध्ये विजयी होतो, तर त्या राज्यातील सर्व इलेक्टर्स त्या उमेदवाराच्या पक्षाकडे जातात. याला ‘विनर-टेक-ऑल’ पद्धत म्हणतात. मात्र, मॅन आणि नेब्रास्का या राज्यांमध्ये पॉप्युलर वोटच्या प्रमाणानुसार इलेक्टर्स निवडले जातात. नेब्रास्कामध्ये ५ इलेक्टोरल कॉलेज आहेत, त्यातले ४ ट्रंप यांनी जिंकले आहेत, तर एक कमला हॅरिसच्या खात्यात गेला आहे. तसेच मॅन राज्यात ४ इलेक्टोरल कॉलेज आहेत, त्यातले ३ कमला हॅरिस यांनी जिंकले आहेत, तर एक ट्रंप यांच्या खात्यात गेला आहे.
इतर सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांना मिळालेल्या मतदानावरून ट्रंप यांच्या विजयाचा दावा केला जात आहे. निर्णायक मानल्या जाणाऱ्या ७ स्विंग स्टेट्समधील ५ स्टेट्सचे निकाल जाहीर झाले आहेत आणि त्यात ट्रंप यांचा विजय झाल्याचा अंदाज आहे. यामुळे ट्रंप यांना एकूण ७६ इलेक्टोरल कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. ज्या २ स्विंग स्टेट्सचे निकाल अजून आलेले नाहीत, त्या ठिकाणीही ट्रंप यांच्या विजयाची शक्यता आहे, म्हणजेच एकूण ७ स्विंग स्टेट्समधून ९३ इलेक्टोरल कॉलेज ट्रंप यांच्या नावावर जातील.
मॅन आणि नेब्रास्काचे निकाल वेगळे केले तर डोनाल्ड ट्रंप यांनी ४८ राज्यांपैकी २७ राज्यांमध्ये विजय मिळवला आहे, आणि २ राज्यांमध्ये ते पुढे आहेत. दुसरीकडे, कमला हॅरिस यांनी १९ राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी वॉशिंग्टन डीसी मध्येही विजय मिळवला आहे, जिथे ३ इलेक्टोरल वोट आहेत.या सर्व राज्यांतील पॉप्युलर वोटच्या आधारावर अंदाज व्यक्त केला जात आहे की डिसेंबरमध्ये होणाऱ्या इलेक्टोरल कॉलेज निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांना ३१२ इलेक्टोरल वोट मिळू शकतात, तर कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल वोट मिळू शकतात.
हेही वाचा-बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी आणखी एकाला पुण्यातून अटक; मुख्य सूत्रधार लोणकर अद्यापही फरार
इलेक्टर्स लोकप्रिय मतांच्या विरोधात मतदान करू शकतात, कारण अमेरिकेत इलेक्टर्सच्या मतदानावर कोणतेही संविधानीक किंवा घटनात्मक कायदे नाहीत. मात्र काही राज्यांनी या संदर्भात नियम बनवले आहेत की त्यांच्या इलेक्टर्सनी लोकप्रिय मतांच्या निकालानुसारच मतदान करणे आवश्यक आहे. तसेच, राजकीय पक्षांनीदेखील आपल्या इलेक्टर्ससाठी अशाच प्रकारचे नियम बनवले आहेत.
नियमांच्या विरोधात मतदान करणाऱ्यांना “फेथलेस इलेक्टर्स” म्हणजेचं बंडखोर म्हटलं जातं. लोकप्रिय मतांच्या विरोधात मतदान करणाऱ्या इलेक्टर्सवर कारवाई केली जाऊ शकते. त्यांच्यावर दंड लावला जाऊ शकतो, तसेच त्यांना मतदानासाठी अयोग्य ठरवून पर्यायी इलेक्टर्स बदललेही जाऊ शकतात.अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये इलेक्टर्सच्या मतदानावरून राज्यांना अधिकार दिले होते की ते यावर आपला स्वतंत्र कायदा तयार करू शकतात.
दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही इलेक्टर्सवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपराधिक कारवाई केली गेली नाही. 2016 मध्ये मात्र काही इलेक्टर्सनी लोकप्रिय मतांच्या विरोधात मतदान केल्यामुळे त्यांना दंड लावण्यात आला आणि अयोग्य ठरवून इलेक्टर्स बदलण्यात आले होते. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत 99 टक्के इलेक्टर्संनी त्यांच्या पक्षाच्या दिलेल्या वचनानुसारच इलेक्टोरल कॉलेज मतदानात मतदान केले आहे, त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या मतदानात उलथफेर होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.