Photo Credit- Social Media (माघार नाहीच, माहीममध्ये सदा सरवणकर अमित ठाकरे लढत होणारच)
मुंबई : महाराष्ट्रात असे अनेक मतदारसंघ आहेत ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यापैकी एक म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातील विद्यमान आमदार सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत व एकमेव उमेदवार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजप मनसेचे अमित ठाकरेंचा प्रचार करणार नसल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्रही समोर आले आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या शिवेसनेला योग्य मार्गावर नेणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या बंडात पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले त्यांचे निकटवर्ती आमदार सरवणकर यांच्या ऐवजी माहीममधून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात येणार, अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात निवडणुकांच्या आधीपासूनच रंगत होत्या. त्यातच अमित ठाकरेंनी माहीममध्ये प्रत्यक्ष अर्ज दाखल केल्याने भर पडली.
पण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत हे स्पष्ट केले की, सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह नव्हते आणि भाजपने कधीच सरवणकरांची उमेदवारी मागे घेण्याची विनंतीही आमच्याकडे केली नव्हती. तरीही विधानसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माहीममध्ये नाट्य घडताना दिसले.
दरम्यान, हा सर्व वाद सुरु होण्यामागे एक कारण असेही होते की, भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेता उमेदवार देऊ नये, असे भाजपचे मत आहे. त्यापाठोपाठ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही सांगितले की, माहीममध्ये भाजपचा पाठिंबा हा अमित ठाकरेंना राहील. मात्र, सरवणकरांचा अर्ज कायम राहिल्यानंतर तसेच सरवणकर हे शिंदेंचे अधिकृत उमेदवार असल्याने शेलार यांनी पक्षाची बाजू पुन्हा स्पष्ट केली आहे.
सरवणकरांच्या उमेदवारीवरील सर्व सावट दूर
शेलार यांच्या खुलासानंतर आता सरवणकरांच्या उमेदवारीवरील सर्व सावट दूर झाले असून, महायुतीचे तिन्ही पक्ष माहीम मतदारसंघात सदा सरवणकरांचाच प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमित ठाकरे-महेश सावंत यांचे आव्हान
सरवणकरांनी 2009 पासून माहीम मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, 2009 मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई यांनी सरवणकरांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावर लढताना सरवणकरांनी 46 हजार मते घेतली होती. मनसेचे सरदेसाई यांनी 40 हजार मते घेतली तर त्यावेळी स्वतंत्र लढलेल्या भाजपाने 33 हजार मतांची कमाई केली होती.
संदीप देशपांडेंना 42 हजार मते
2019 मध्ये शिवसेना व भजापाची युती झाल्यानंतर सरवणकरांनी माहीममध्ये 61 हजार मते घेत विजय मिळवला होता. मनसेचे संदीप देशपांडे यांना 42 हजार मते पडली. मनसेची माहीमधील मते साधारण तेवढीच राहिलेली आहेत.