वैजापूर विधानसभेसाठी ३० जणांचे अर्ज
वैजापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात मंगळवार (दि.29) हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत 30 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह महायुतीचे उमेदवार व शिवसेना (ठाकरे गट) व महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र, झारखंडच्या निकालानंतरच संसदेचे हिवाळी अधिवेशन; सत्ताधाऱ्यांकडून तयारी सुरु
विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करावयासाठी 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत 30 विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यामध्ये आमदार रमेश बोरनारे (शिवसेना), बाबासाहेब पगारे ( बहुजन समाज पार्टी), विजय शिनगारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष), नबी पटेल, मंजाहरी गाढे, प्रशांत सदाफळ, सय्यद रऊफ, अजय साळुंके ( अपक्ष), किशोर जेजुरकर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. दिनेश परदेशी (उबाठा शिवसेना), अप्पासाहेब पाटील, भागवत निकम (अपक्ष) यांच्यासह अनेकांनी अर्ज केले आहेत.
दरम्यान, आता हे अर्ज जरी प्राप्त झाले असले तरी लगेच याची छाननी केली जाणार असून, या छाननीनंतर कोणाचा अर्ज बाब होऊन नंतर नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
शेवटच्या दिवशीही उमेदवारांची यादी सुरुच
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीने मंगळवार दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच ठेवलं होतं. अखेरपर्यंत महायुतीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही.
महाविकास आघाडीकडूनही जागावाटपाचा फॉर्म्युला नाहीच
महाविकास आघाडीतील नेत्यांनी 85-85-85 असा फॉर्म्युला सांगितला होता. मात्र, काँग्रेसने 100 हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील 85 हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील 85 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा नेमका जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
हेदेखील वाचा : उद्योग विभागाकडून विधानसभा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर! विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला सुट्टी