
उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्याचा उद्रेक; राष्ट्रवादीचे कार्यालयच फोडले, बॅनरही फाडला
नागपूर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात अनेक इच्छुकांना उमेदवारी देण्यात आली तर काही इच्छुक किंबहुना निष्ठावान कार्यकर्त्याला ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याचे चित्र आहे. असे असताना उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने चक्क पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात तोडफोड केली. एवढेच नव्हे तिकिटे विकल्याचा आरोपही या कार्यकर्त्याने केल्याने खळबळ उडाली.
सध्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यात उमेदवारी नाकारल्याने सर्वच पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट सुरू आहे. भाजपने महायुतीमध्ये सन्मानजनक जागा न दिल्याने स्वबळावर लढण्याची तयारी केलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसला. उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने चक्क पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात तोडफोड केली. एवढेच नव्हे तिकिटे विकल्याचा आरोपही केला.
हेदेखील वाचा : Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात एकही जागा न सोडल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, काहींचा हिरमोड झाला. प्रभाग क्र. ५ मधून अविनाश पार्डीकर या कार्यकर्त्याने उमेदवारी मागितली होती. त्याने मंगळवारी दुपारी गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात सर्वच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु त्याला उमेदवारी नाकारण्यात आली.
टीव्हीसह बॅनरही फाडला
संतप्त झालेल्या अविनाश पार्डीकरने कार्यालयात तोडफोड केली. त्याने संतापाच्या भरात कार्यालयातील टीव्ही फोडला. त्यानंतर शिवीगाळ करत बाहेर पडला. बाहेर गेटवर लागलेले बॅनर फाडले. त्यानंतर कार्यालयाच्या काचावर जवळच पडलेल्या आयब्लॉक फेकून मारला. त्यामुळे कार्यालयाच्या काचा फुटल्या. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कार्यालयाबाहेरच पदाधिकाऱ्यांनी तिकिटे विकल्याचा आरोपही केला. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली. अखेर पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना तोडफोडप्रकरणी तक्रार केली. या घटनेने कार्यकर्त्यांमधील असंतोष उफाळून आला.
कार्यकर्त्यांनी संयम राखणे आवश्यक
सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम राखणे आवश्यक आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराजी स्वाभाविक आहे. परंतु, अशी तोडफोड करणे हा पर्याय नाही. उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल.
– अनिल अहिरकर, शहराध्यक्ष.