
शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची स्वतंत्र भरपाई मिळणार
कुरुंदवाड : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामासाठी पुढील टप्प्यात अंकली-चोकाक दरम्यानच्या ३३ किलोमीटर रस्त्याचा सविस्तर सर्व्हे होणार असून, या सर्व्हेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या इमारत, पाईपलाईन, शेड, विहिरी, बोअरवेल, फळझाडे तसेच जंगली झाडे यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संभाव्य नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची स्वतंत्र भरपाई मिळणार असून, शेतकऱ्यांनी सर्व्हेदरम्यान येणाऱ्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात अर्ज द्यावेत, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.
महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी संपादित होणाऱ्या जमिनीला चौपट दराने भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, हा निर्णय शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या आगामी सर्व्हेमुळे होणाऱ्या इमारत, पाईपलाईन, शेड, विहिरी, बोअरवेल, फळझाडे व जंगली झाडे यांच्या नुकसानीचीही नोंद घेऊन योग्य भरपाई देण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने
रस्ता सर्व्हेमुळे शेतजमिनीतून जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन, विहिरी, बोअरवेल तसेच फळझाडे व अन्य जंगली झाडे बाधित होण्याची शक्यता असून, या सर्व नुकसानीचा समावेश भरपाई प्रक्रियेत केला जाणार आहे. यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील होणाऱ्या संभाव्य नुकसानीची माहिती (जमीन, इमारत, पाईपलाईन, शेड, विहीर, बोअरवेल, फळझाडे, जंगली झाडे) असा स्पष्ट तपशील लेखी अर्जाद्वारे द्यावा, असे आवाहन आमदार यड्रावकर यांनी केले आहे.
अर्जामध्ये संबंधित सर्व मालमत्तेचा स्पष्ट उल्लेख केल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. महामार्ग विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी शासन सकारात्मक असून, सर्व बाधित शेतकऱ्यांनी होणाऱ्या सर्वेमध्ये आपल्या मालमत्तेची होणारे नुकसान अर्जाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, जेणेकरून त्याचीही योग्य भरपाई मिळेल, असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा