
Candidates have started wearing astrological rings and amulets municipal election 2026
Maharashtra Local Body Elections : पुणे : आकाश ढुमे पाटील : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पुणे, मुंबईसह 26 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती–आघाड्यांमधील जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू असतानाच इच्छुक उमेदवारांची धाव मात्र थेट देवस्थानांकडे, बुवा–बाबांकडे आणि ज्योतिषांच्या दारी लागली आहे. कुणाच्या बोटात नवे खडे झळकत आहेत, तर कुणाच्या मनगटावर काळे, भगवे, लाल गंडेदोरे आवळले गेले आहेत.
अर्ज भरण्याचा मुहूर्त कोणता, प्रचार कधी सुरू करायचा, सभा कोणत्या दिवशी घ्यायची, अगदी उमेदवारी टिकेल की नाही यापर्यंत अनेकजण ज्योतिषांचा सल्ला घेताना दिसत आहेत. पुण्यातील अनेक इच्छुकांनी शिर्डी, तिरुपती बालाजी, उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत भरलेले उमेदवारी अर्ज पायाशी ठेवून ‘राजकीय यशासाठी’ आशीर्वाद मागितल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर
कर्मापेक्षा ग्रहांवर अधिक विश्वास
कर्म, काम आणि जनसंपर्कापेक्षा ग्रह-नक्षत्रांवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या काही इच्छुकांनी पाचू, पोवळे, नीलम अशा खड्यांच्या अंगठ्या खास बनवून घेतल्या आहेत. कुंडलीतील राजयोग, विजययोग, दशा–अंतरदशा पाहून मंत्रजप, शांती, यज्ञयाग असे विविध उपाय सुचवले जात असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. काही इच्छुकांनी तर नोव्हेंबर महिन्यापासूनच हे उपाय सुरू केल्याचेही समजते.
कुलदैवतांच्या चरणी माथा
काही उमेदवार आपल्या कुलदैवतांच्या दर्शनासाठी गावाकडे धाव घेत आहेत. ज्यांना गुरू मानले जाते, अशा आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या भेटी, बाबा–बुवांकडे फेर्या वाढल्या आहेत. मनगटावर दिसणारे गंडेदोरे, कपाळावरची राख किंवा वेगळी पूजा ही निवडणुकीच्या धामधुमीत सहज लक्ष वेधून घेत आहे.
आहारावरही बंधने
सामिषाशिवाय जेवण न करणाऱ्यांनाही काही बाबा–बुवांनी आहाराबाबत पथ्ये घातल्याने ‘पालापाचोळा’ खाण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. निवडणूक जिंकण्यासाठी देव, दैव आणि ग्रहांना प्रसन्न करण्याचा हा सारा खटाटोप सुरू आहे.
अंधश्रद्धेवर टीका
या बुवाबाजीबाबत सामान्य लोकांनी देखील चीड व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिक ऋषी काळे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “बाबा–बुवांकडे जाऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. काम, जनसंपर्क आणि विश्वासार्हता यावरच विजय मिळतो. करणी, मंत्रतंत्र किंवा तथाकथित ज्योतिषी उपायांवर अवलंबून राहणे ही अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेची बाब आहे”
हे देखील वाचा : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने
पुणे महापालिकेच्या रणधुमाळीत उमेदवारांचे पाय जमिनीवर कमी आणि देवस्थानांच्या पायऱ्यांवर अधिक पडत असल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. निवडणुकीचा कौल मात्र ग्रह नव्हे, तर मतदारच लावणार आहेत, हे वास्तव किती जणांना उमगते, हे निकालच ठरवतील.