Congress state president Nana Patole Mahayuti government of did agricultural scam
नागपूर : राज्यामध्ये लवकरच महायुतीचे नवीन सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापनेसाठी शपथविधीची जोरदार तयारी व लगबग सुरु आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याचे काऊनडाऊन सुरु झाले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा नेतृत्व दिले जाणार की भाजप त्यांचे धक्कातंत्र वापरुन नवीन चेहऱ्याला संधी देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, महायुतीच्या या शपथविधी सोहळ्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता. विधानसभेची मुदत संपल्यानंतर देखील सरकार स्थापन न झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता सरकार स्थापनेला वेग आला असून लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला गटनेते म्हणून प्रस्ताव मान्य केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरुन दावा सोडला आहे. तरी काही खात्यांवर शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी ते म्हणाले की, ,”मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भारतीय जनता पक्ष काय आहे हे आता कळेल आणि आता ते कळायला सुरुवात झाली”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
पुढे नाना पटोले म्हणाले की, ” महायुती सरकार जनतेच्या मतांमुळे जिंकले नाही. तर दिल्लीत भाजपावाले बसले आहेत. त्यांच्यामुळे महायुती जिंकली आहे. त्यांना लोकांची फिकीर नाही. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली असून ते काय निर्णय घेतात ते पाहू. मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली, हा आम्ही पहिला मुद्दा उपस्थित केला. मतदारांची नावे हटविण्याच्या प्रक्रियेसाठी विहित फॉर्म आणि प्रक्रियांचे पालन करणं आवश्यक आहे. ते आम्हाला समजण्यासाठी बूथ-निहाय आणि मतदारसंघनिहाय तपशीलवार डेटा आवश्यक आहे. मात्र, मतदारांची नावे काढून टाकण्यात आल्याचा डाटा सध्या उपलब्ध नाही”. असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
नाना पटोले यांची दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. याबैठकीमध्ये कॉंग्रेसने ईव्हीएम मशीन व मतदानाची टक्केवारी अचानक वाढल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, आमचा दुसरा मुद्दा मतदार यादीत नवीन नावे जोडण्याबाबत आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका पाच महिन्यांनी होताना सुमारे पाच महिन्यांत सुमारे 47 लाख मतदारांची नावे जोडण्यात आली आहेत. या जोडण्यांसाठीचे फॉर्म कोठे आहेत? कोणत्या आधारावर नावे जोडण्यात आली आहेत? मतदारांच्या नावांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली आहे. आम्हाला जोडण्यात आलेल्या 47 लाख मतदारांचा कच्चा डाटा हवा आहे”. अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.