महायुतीचा 'हा' संभाव्य फॉर्म्युला ठरतोय चर्चेचा विषय
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. इतकेच नाहीतर मुख्यमंत्री कोण हे देखील महाराष्ट्राला कळले नाही. असे जरी असले तरी गुरुवारी (दि.5) महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर कोण असेल याची घोषणा केली जाणार आहे. असे असतानाच खातेवाटपचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.
हेदेखील वाचा : Chief Minister: काळजीवाहू मुख्यमंत्री ‘या’ खात्यांवर ठाम; फडणवीस-शिंदेंच्या बैठकीत तोडगा नाहीच, आज काय होणार?
सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे दिसत होते. त्यामुळेच त्यांची नाराजी असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. अडीच तास चाललेल्या या बैठकीनंतर आता सर्व काही ठीक असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे. भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन मुंबईत पोहोचले आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होणार हे निश्चित मानले जात आहे. यानंतर त्यांची महायुतीच्या नेतेपदी निवड होणार आहे.
भाजप गृहखात्यावर ठाम
नवीन सरकारमध्ये गृहखाते मिळविण्यासाठी शिंदे यांनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना हे खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. मग नवीन सरकारमध्ये शिंदेंना हा विभाग का देता येणार नाही, असा शिवसेना नेत्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, भाजपाला कोणत्याही किमतीत गृह खाते आपल्याकडेच ठेवायचे आहे. शिंदे यांनी महसूल खात्याचीही मागणी केली आहे, मात्र तीही भाजपने फेटाळून लावली आहे.
असा असेल संभाव्य फॉर्म्युला…
महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये 43 संख्या असलेल्या मंत्रिमंडळात भाजपचे 21 मंत्री असतील तर शिवसेनेचे 12 असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री असतील, अशी माहिती देण्यात येत आहे.
कोणती खाती राहू शकतात भाजपकडे?
मुख्यमंत्री, गृहमंत्रालय आणि सभापतिपद कायम ठेवणार.
कोणती खाती राहू शकतात शिवसेनेकडे?
उपमुख्यमंत्री, नगरविकास, महसूल आणि विधानपरिषद सभापती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे काय असेल?
उपमुख्यमंत्री, अर्थ, उपसभापती. महामंडळांचे विभाजन नंतर केले जाईल.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण? भाजपकडून आज केली जाणार घोषणा; देवेंद्र फडणवीस की…