Photo Credit- Social Meda
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप-महायुतीला चांगले यश मिळाले आहे. बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. असे असताना आता उद्धव ठाकरे आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने तयारीही केली जात असल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा The Sabarmati Report : “हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा…”; संजय राऊतांचे NDA ला थेट चॅलेंज
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील सर्व आजी-माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी आजी-माजी नगरसेवकांसोबत चर्चा करताना ठाकरे म्हणाले, आम्हाला सोडून गेलेल्या गद्दारांची पर्वा नाही. आता आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी नवीन उड्डाण भरायची आहे. ईव्हीएमचा प्रश्न आहे, आम्ही त्यात लक्ष घालू. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी तुम्ही कामाला लागा. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. बेफिकीर राहू नका, लोकांमध्ये जा आणि नव्या ऊर्जेने काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर आयोजित केले जाईल, अशी माहिती आहे.
227 प्रभागांत तयारीला सुरुवात
ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली असून, बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे. पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाणार आहे.
हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार
ठाकरे पुढे म्हणाले, बीएमसी निवडणुकीत आपल्याला हिंदुत्वाचा मुद्दा जनतेसमोर जोरकसपणे मांडायचा आहे. शिवसेना पूर्वीपासून हिंदुत्वासाठी लढत आहे, आजही लढत आहे आणि भविष्यातही लढत राहील. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, असा अपप्रचार विरोधक करत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्या. तळागाळात काम करा. बीएमसीवर भगवा फडकवायचा आहे. आतापासूनच कामाला लागा, असे निर्देशही त्यांनी दिले.
हेदेखील वाचा : एकनाथ शिंदेची नाराजी दूर होणार? महायुतीतील तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सूचवला उपाय