Congress Priyanka Gandhi Shirdi sabha marathi news
शिर्डी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारासाठी आता दिल्लीतील नेते सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या रिंगणात उतरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिर्डीमध्ये प्रियांका गांधी यांची पहिली सभा पार पडली. पहिल्याच सभेमध्ये प्रियांका गांधींनी महायुतीचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी?
“महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सत्य, समानता आणि मानवता कणाकणांमध्ये भरली आहे. महाराष्ट्र हा नेहमी मार्गदर्शक राहिला आहे. धार्मिक कट्टरताचा विरोध आणि समानतेची मागणी हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार राहिला आहे. मागच्या दहा वर्षातील मोदींच्या आणि भाजपच्या सरकार काळामध्ये आणि महाराष्ट्रातील अडीच वर्षांतील महायुतीच्या सरकारमध्ये सत्य व खरेपणा याला काहीच किंमत राहिलेली नाही. देशाचे पंतप्रधान असो वा इतर मोठे नेते आहेत ते काहीही बोलायला लागले आहेत. त्यांना या गोष्टीची पर्वाच नाहीच की जे मी बोलत आहे त्याचा परिणाम काय होणार आहे? हे खरं आहे का? याने कोणाचं भलं होणार आहे का? असं या नेत्यांना वाटतंच नाही,” असे मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.
‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे मारणारे खुलं पत्र
पुढे त्या म्हणाल्या की, “संपूर्ण देशाचे गौरव असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. मतदारांचा अपमान केला जात आहे. शिवाजी महाराजांचे स्मारकाचे जलपूजन केले पण पुतळा बनवलाच नाही. संसदेच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकला. आणि सिंधुदुर्गमध्ये बांधलेला पुतळा नित्कृष्ट कामामुळे कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला जात आहे. तर मग प्रत्येक सभेला आणि मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यामध्ये अर्थ काय आहे?” असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.
प्रियांका गांधी यांनी महायुतीच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, “यांच्या सरकारच्या काळात दुधाला भाव नाही, पिकाला हमीभाव नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी देखील दिली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की पैसे नाही म्हणून म्हणतात. मात्र मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले आहेत. याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीच. जिथे जिथे कॉंग्रेसचे राज्य आहे तिथे तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. मोदीजी तेव्हा सरकार वेगळे होते, आज सरकार वेगळे आहे,” असा टोला प्रियांका गांधी यांनी भरसभेमध्ये लगावला आहे.