"राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात?" देवेंद्र फडणवीसांची टीका
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे.’आपले संविधान निळ्या रंगाचं आहे, पण राहुल गांधींचे संविधान लाल रंगाचं आहे. राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. एका मुलाखतीत फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
विधानसभा निवडणूकमध्ये महाविकासआघाडी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रात येत आहेत. नागपूर विमानतळावरून राहुल गांधी थेट दीक्षाभूमी येथे दाखल झाले आहे. आज राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या सभेपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींना अराजकवादी आणि शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे. राहुल गांधी आता काँग्रेसवाले राहिलेले नाहीत.भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची असताना ते लाल रंगात असलेले राज्यघटनेचे पुस्तक दाखवत असतात. लाल रंग दाखवून ते कोणाता संकेत आणि संदेश देतात? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
हे सुद्धा वाचा: “फडणवीस नव्या युगातले जनरल डायर…”, शरद पवार गटातील नेत्याची टिका
दुसरीकडे, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. तुमच्याकडे सर्व यंत्रणा असताना संस्थेतील लोकांची चौकशी करा. उपमुख्यमंत्री दलित आणि ओबीसी संघटनांना शहरी नक्षलवादी म्हणत त्यांचा अपमान करत आहेत.”भाजपानं राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ‘नौटंकी’ म्हटले तर त्याचा अर्थ भाजप घाबरत आहे. कार्यक्रमाला ‘शहरी नक्षलवादी’ म्हणणे हा समाजाचा अपमान आहे. तुम्ही त्यांना ‘शहरी नक्षलवादी’ म्हणत असाल तर हे ‘शहरी नक्षल’ कोण आहेत, याची गृहमंत्र्यांनी चौकशी करावी. तुम्ही सामाजिक संघटनांचा अपमान केला आहे. ते विधानसभा निवडणुकीत बदला घेतील,” असे वडेट्टीवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्ष काँग्रेसने संविधान धोक्यात असल्याचा दावा केला होता. ‘संविधान वाचवा’ ही घोषणा निवडणूक प्रचारातही खूप गाजली होती. राहुल गांधी यांनीही अनेकवेळा संविधानाची प्रत हातात ठेवल्याचे दिसून आले आहे. लोकसभेत शपथविधीच्या वेळीही त्यांच्या हातात लाल रंगाची संविधानाची प्रत होती.
हे सुद्धा वाचा: भाजपची मोठी कारवाई, 37 जागांवर बंडखोरी करणाऱ्या 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून करणार आहे. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.