why raj Thackeray not gives candidates against aditya Thackeray
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणूक आल्यामुळे पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर केले जात आहेत. यासाठी जागावाटपाची चर्चा अगदी दिल्ली दरबारी सुद्धा सुरु आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे. मनसेने उमदेवारांच्या तीन यादी जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर आता अमित राज ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत, त्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका लढवणार आहेत. त्यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे माहिममध्ये मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे परिवारातील आणखी एक व्यक्ती राजकारणामध्ये येत असल्यामुळे उद्धव ठाकरे गट हा माहिममधून उमेदवारी देणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आदित्य ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये वरळी मतदारसंघातून राजकारणामध्ये प्रवेश केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी वरळीमधून उमेदवार न देत नाते निभावले होते. यानंतर आता उद्धव ठाकरे हे माहिम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संवाद साधला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका माध्यम वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देण्यामागे राज ठाकरेंची भावना सांगितली. बाळा नांदगावकर म्हणाले की, “बाळासाहेबांची ही तरुण मुलं राजकारणात उतरत आहेत, याचा मला फारच आनंद आहे. आदित्य जेव्हा राजकारणात येत होता, तेव्हा सर्वात जास्त आनंद हा राज ठाकरेंना झाला होता. राज ठाकरेंनी त्यावेळी निर्णय घेतला होता की माझ्या कुटुंबातील माणूस जर राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल. त्यामुळेच राज ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला नव्हता. राज ठाकरे हा नावाने राज नाही तर मनाने देखील राजा आहे. म्हणूनच राज ठाकरे यांनी आदित्यच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता” असे स्पष्टीकरण बाळा नांदगावकर यांनी दिले. आणि राज ठाकरे यांची भावना अधोरेखित केली.
हे देखील वाचा : जरांगे पाटलांच्या समर्थकांनी अडवला भाजपचा उमेदवार; रस्त्यात थांबून केली घोषणाबाजी
पुढे मुलाखतीमध्ये राजकारणामध्ये संस्कृती जपली पाहिजे असे देखील बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “पण दादर माहीम मतदारसंघांबद्दल काय करायचं हा सर्वस्वी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. त्यात आम्ही काहीही बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांना आजदेखील माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या विरोधात संदीप देशपांडे आहेत, त्यांचा अर्ज भरायला मी जाणार आहे. कोणत्याही उमेदवाराला शुभेच्छा देणं चुकीचं नाही. राजकारण ही एक संस्कृती आहे. टीका ही सभागृहात होत असते,” त्याबाहेर संस्कृती जपायला पाहिजे” असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.