ajit pawar clear on distribution of mahayuti seats for vidhansabha
इंदापूर : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते पक्षातील उमेदवारांची नावं जाहीर करत आहेत. यंदा पहिल्यांदाच या युतीमधील नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे जागावाटपामध्ये अनेक इच्छुकांची आणि विद्यमान नेत्यांची नाराजी समोर येत होते. आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. त्यानंतर आता संजय सोनावणे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीने अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधून अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी इंदापूरमध्ये संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण प्रत्येकजण उमेदवार देण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. पहिल्या दोन यादी जाहीर केली आहे. लवकरच तिसरी यादी देखील जाहीर केली जाईल. अजून महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. काल दिल्लीमध्ये दिवसभर चर्चा सुरु होती तर आजही दिल्लीमध्ये काही नेते चर्चा करत आहेत. महायुतीमध्ये फक्त 288 पैकी 11 जागांबद्दल चर्चा सुरु आहे. 11 जागांची फक्त विभागणी बाकी राहिली आहे. सगळीकडे समाधानी ठेवता येत नाही. काही लोकं नाराज राहतात. युतीमध्ये हे होत असतं,” अशी भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : ‘अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला…’; नाराज नेत्याची जहरी टीका
अजित पवार पुढे म्हणाले की, मी नेहमी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारने चाललो आहे. यापुढे देखील तीच विचारधारा असणार आहे. त्यामुळे कोणीही आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करुन घेऊन नका. यावेळेस मला महायुतीमध्ये ज्या जागा मिळणार आहेत त्यापैकी 10 टक्के जागा या मी अल्पसंख्याकांना देणार आहे. काही उमेदवार देखील जाहीर केले आहेत, असे मत अजित पवार यांनी मांडले आहे.
राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढलं
अजित पवार यांच्या पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी इनकमिंग वाढलं आहे. मागील काही तासांमध्ये अनेक बड्या नेत्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यांना तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी देखील कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आहे. त्याचबरोबर भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ते जयंत पाटील यांना कडवी लढत देणार आहेत. भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना त्यांच्या वडीलांच्या मतदारसंघावर विधानसभा निवडणूक उमेदवारी देण्यात आली आहे.