Proof may needed while Carrying Above 50 Thousand Cash in Gondia
गोंदिया : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यानुसार, पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात आता तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास ती जप्तीच्या अधीन असेल. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत प्रवासादरम्यान पुराव्याशिवाय 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Gopal Shetty Rebellion: देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढणार; बडा नेता करणार बंडखोरी
विधानसभा निवडणुकीतील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या सीमांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आणि जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जप्त रोकड निर्णय समिती गठित करण्यात आली आहे.
निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करत आहे. कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसर निवडणुकीदरम्यान स्थिर संनिरीक्षण चमू आणि पोलिस विभागाकडून चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, अत्यावश्यकप्रसंगी 50 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगणे आवश्यक असल्यास त्या संबंधित आवश्यक तो पुरावा सोबत ठेवावा, असे निर्देश देण्यात आले. गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभागाने ठिकठिकाणी तपासणी चौक्या सुरू केल्या आहेत.
राज्यभरात ठेवली जातीये चोख सुरक्षा व्यवस्था
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील खेडशिवापूर येथे रोख रक्कम असलेली कार पोलिसांनी पकडली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा पोलीस पथकाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
मंगळवारी उशिरापर्यंत नाकाबंदी
यादरम्यान मंगळवारी उशिरापर्यंत नाकाबंदी झाली होती. त्यात एक कोटी 58 लाखांची रोकड, 6 लाख 13 हजार रुपयाचे मद्य आणि 3 लाख 10 हजार अमली पदार्थ असा एकूण तब्बल 1 कोटी 90 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अशाच स्वरूपाची ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी केरळमध्ये भीषण अपघात, मंदिर उत्सवात फटाक्यांचा स्फोटात 150 जखमी