
राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. बैठका, जाहीरसभाही दररोज होताना दिसत आहे. मात्र, आता राज्यातील 29 महापालिकांसाठीच्या प्रचाराचा धडाका मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता थांबणार आहे. या सर्व महापालिकांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या होम टाऊन नागपुरात ‘रोड शो’ करून जनतेशी थेट संवाद साधतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका जिंकणे भाजप-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ठाणे या बालेकिल्ल्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय राहतील. इतर विरोधी पक्षांचे दिग्गज नेतेही आपापल्या शहरांमध्ये ताकद पणाला लावतील. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. या काळात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील उमेदवारांचा उत्साह वाढवण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी होतील.
हेदेखील वाचा : Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला
ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र
मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी विशेष महत्त्वाची आहे. 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र मिळून निवडणूक लढवत आहेत. मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’चा किती दबदबा आहे, हे बीएमसीच्या निकालावरून स्पष्ट होईल.
13 ते 16 जानेवारीपर्यंत ‘ड्राय डे’
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 13 ते 16 जानेवारी या चार दिवसांसाठी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला आहे. या काळात दारूची दुकाने बंद राहतील. प्रचार संपताच 29 मनपा क्षेत्रांत दारू विक्रीवर बंदी लागू होईल. या क्षेत्रांतील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहतील.
मुंबईत राहणार सर्वाधिक चुरस
29 महापालिकांमधील २८६९ सदस्य पदांसाठी एकूण १५९३१ उमेदवार रिंगणात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत २२७ जागांसाठी सर्वाधिक १७०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणे महानगरपालिका असून तिथे १६५ जागांसाठी ११६६ उमेदवार आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेत ६५ जागांसाठी सर्वात कमी म्हणजे २३० उमेदवार रिंगणात आहेत.
हेदेखील वाचा : “शिवसेनेची 25 वर्ष भाजपासोबतच्या युतीत सडली…”, ठाण्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना झोडपले