Samarjitsinh Ghatge is strongly campaigning in Kolhapur Assembly Election 2024
कागल : विरोधकांकडून मतदारांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. देव देवतांच्या नावाखाली मतदारांच्या भंडाऱ्यावर शपथ घेण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात उघडपणे सुरू आहे. मताला शपथ द्यायची नाही. शपथ घेणाऱ्याला उमेदवाराला मत द्यायचे नाही. असा निर्धार कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी, सुज्ञ जनतेने केला आहे. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
बानगे (ता.कागल) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी समरजीतसिंह घाटगे म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांच्या लोकं कल्याणकारी राज्य कारभाराची प्रेरणा घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानात अनेक बाबींचा समावेश केला. त्यांनी दिलेल्या संविधानातील नागरिकांच्या मताच्या अधिकारानुसार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मिळाला मताचा अधिकार अनमोल आहे. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे,” असे मत समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केले आहे.
रावसाहेब दानवे मारत आहेत कार्यकर्त्यांना लाथ; राजकीय वर्तुळामध्ये आहे याचीच ‘बात’
पुढे ते म्हणाले की, “पालकमंत्र्यांना महिलांचा आदर करावा असे वाटत नाही. हसन मुश्रीफ दलित समाजाला आता तुमचे भावनिक भाषण नको आहे. तुमच्यामध्ये धाडस असेल तर पंचवीस वर्षात दलित समाजातील किती तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सहकार्य केले हे जाहीरपणाने सांगावे. सर्वसामान्य गरिबांची मुलं शिकणाऱ्या शाळेत शौचालय नाहीत. शाळांच्या इमारती धड नाहीत. कौले असणाऱ्या शाळातून पावसाळ्यात पाणी गळती होते. पंचवीस वर्षात मुश्रीफांनी शिक्षणासाठी निधी आणला नाही. नवीन शाळा बांधल्या नाहीत. मात्र त्यांनी कागलमध्ये स्वतःची खाजगी टुमदार शाळा बांधली. ती चकाचकी ठेवली. अशा पद्धतीची शाळा त्यांनी मतदारसंघात का बांधल्या नाहीत. याचे उत्तर येथील जनता या निवडणुकीत परिवर्तन करून मुश्रीफांना देईल,” असा घणाघात समरजीतसिंह घाटगे यांनी केला.
यावेळी माजी उपसरपंच धनंजय पाटील म्हणाले, “नवोदिता घाटगे कार्याध्यक्ष असणाऱ्या राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबीरे, हेल्थ फॉर हर तसेच महिलांच्या हातांना काम देणे. त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेणे हे काम सात्यपूर्ण गेली आठ वर्षे सुरू आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माऊली महिला संस्था पावसाळ्यात भूछत्र उगवते त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर उगवते व नाहीशी होते. नाचणारा मोर आणि पैशाचा खेळ जास्त काळ टिकत नाही. जनतेने या सर्व गोष्टींचा विचार करून सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, महिलांसाठी काम करणाऱ्या समरजीतसिंह घाटगे यांना या निवडणुकीत विजयी करावे,” असे आवाहन त्यांनी केले.