
BJP leaders Lahu Balwadkar and Ganesh Kalamkar responded to Amol Balwadkar allegations
Pune Political News : पुणे: राज्यामध्ये 29 पालिकांसाठी निवडणूका जाहीर झाल्या असून राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोथरुड आणि बाणेर-बालेवाडी परिसरात पालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात आता भाजपचे लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मतदारांना गुमराह करण्यासाठी खोटा नॅरेटिव्ह सेट केला जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
”उमेदवारी रद्द झाली तर ती राष्ट्रवादीचीही…”
उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर गणेश कळमकर म्हणाले, “जर भाजपची उमेदवारी रद्द झाली असे विरोधक म्हणत असतील, तर मग राष्ट्रवादीच्या प्रमोद निम्हण यांचीही उमेदवारी रद्द झाली ना? आमच्या पक्षात नियमानुसार काम चालते, कोणाची मनमानी चालत नाही. पक्षाने इच्छुकांना संधी दिली होती, त्यातून योग्य निर्णय झाला आहे.” अशी भूमिका कळमकर यांनी घेतली.
हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापलं; इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला
अमोल बालवडकरांवर निशाणा: “विषाचा पेढा वगैरे सर्व खोटं”
अमोल बालवडकर यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भावनिक आवाहनांचा समाचार घेताना लहू बालवडकर म्हणाले, “मला कुणी विषाचा पेढा चारला वगैरे जे बोलले जात आहे, त्यात काडीचाही दम नाही. अजित दादांनी हात दिला वगैरे सोशल मीडियावरील दावे केवळ निवडणुकीपुरते आहेत. यापूर्वी हे लोक कुठे होते? जनतेच्या सुख-दु:खात कधी दिसले नाहीत.” असा आरोप लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्यावर केला आहे.
गुन्हेगारी आणि पैशांच्या जोरावर गर्दीचा आरोप
विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना कळमकर यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आमच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी आणि त्यांच्यावर असलेले गुन्हे जनतेने पहावेत. अजित दादांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटले गेले. त्या दिवशी १०-१५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.” असा टोला कमळकर यांनी लगावला.
हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये भाजप अन् कॉंग्रेसचे हातात हात! अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार, भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा
”निष्ठा तुटलेली नाही, मते मोदी-फडणवीसांनाच”
”आमची पक्षाप्रती असलेली निष्ठा कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर किंवा सुप्रिया सुळेंच्या गाडीत भाजपचे कोण लोक होते, हे जगाने पाहिले आहे. आम्हाला पक्षाने आदेश दिला असता तर आम्ही नक्कीच थांबलो असतो,” असे स्पष्ट करत त्यांनी बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. हे मत वैयक्तिक कुणाला नसून देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना आहे. जास्तीत जास्त निधी आणून प्रभागाचा विकास करणे हाच आमचा एकमेव अजेंडा असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.