विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांची कोल्हापूरमध्ये सभा पार पडलीय (फोटो - टीम नवराष्ट्र)
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रियांका गांधी यांची शिर्डी व कोल्हापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्र हा संत महात्म्यांची पवित्र भूमी आहे. ही महापुरूषांची भूमी आहे. या भूमीतून मानवता आणि समतेचा संदेश देण्यात आला. या सर्वाचे स्वातंत्र्याच्या लढाईत मोठे योगदान आहे. या भूमीत आल्यानंतर अभिमानास्पद वाटते. पण महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान होत आहे, शिवरायांचा सुद्धा अपमान केला आहे. अशा सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी यांनी केले .
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रचारार्थ ऐतिहासिक गांधी मैदानात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच करवीर निवासिनी अंबाबाई ,लोकराजे राजश्री शाहू महाराज यांचा मराठीत उल्लेख करून उपस्थितांचे वाहवा मिळवली. शाहू, फुले ,आंबेडकरांची ही नगरी असून देशाला आजादी मिळवून देण्यासाठी येथील स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिली आहे. एकनाथ ,नामदेव, तुकाराम या संतांनी समानता मानवतेचा संदेश दिला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली.
गद्दारांना पाडा पाडा पाडा…शरद पवारांची वाईच्या सभेत तुफान राजकीय टोलेबाजी
पुढे त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकली की दुःख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. जे नेते प्रचार करतात त्यांच्याकडून अपेक्षा असते की सकारात्मक बोलतील, चांगले विचार मांडतील, पण असं होताना दिसत नाही. ही खरी शोकांतिका आहे. मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात, पण शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. अन्य एके ठिकाणी काम सुरू होत ते आता बंद झाले आहे. महागाईचा सामना सर्वजण करत आहेत. मोदी व्यासपीठावर येतात आणि लाडकी बहीण बोलतात, निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली.आपलंच पैसे काढून घेतले आणि आता देत आहेत. निवडणुकीत पैशाच्या आधारावर, जाती धर्मावर बोलून निवडणूक जिंकता येते, असा त्यांचा समज झाला आहे त्यामुळे ते काम करत नाहीत. ज्या मुद्दयावर काम केलं पाहिजे ज्या मुद्दयावर चर्चा केली पाहिजे त्यावर बोललं जात नाही,” असं मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले.
प्रियांका गांधींनी स्वीकारले नरेंद्र मोदींचे आव्हान; भरसभेत बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत…
पुढे प्रियांका गांधी म्हणाल्या की, “गेल्या दहा वर्षात या सरकारने काय काम केले ते आधी सांगावं आणि मगच निवडणुकीला सामोरे जावं. या देशात, राज्यात आता नवीन परंपरा सुरू झाली आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात असा त्यांचा समज झाला आहे. राज्यातील सहा हजार उद्योग बंद पडले आहेत. आठ लाख तरुण बेरोजगार झाले आहेत. जीएसटी कराच्या बोजाणे छोटे उद्योग, मोठे उद्योग बंद झाले आहेत. सत्तेवर बसून हे खरेदी करणारे सरकार असून सरकार जनतेने निवडले असले तरी आपली शक्ती ,आपली ताकद हे त्यांचे पाठबळ आहे हे ते विसरून गेले आहेत. भविष्यात आपल्या मुलांचे भवितव्य निभावयाच असेल तर निवडणुकीची ही लढाई आपण जिंकावी,” असे प्रियांका गांधी यांनी मतदारांना आवाहन केले आहे.