बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. आता निकालासाठी अवघे काही तास बाकी राहिले असून सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये उलथा पालथ झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत होणार आहे. निकालासाठी अवघे काही तास बाकी राहिल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये जाहीर होणार आहे. काही नेते देवदर्शनाला गेले आहेत तर काही नेते परिवारासोबत वेळ घालवत आहेत. मात्र शरद पवार यांनी निकालाच्या एकादिवसआधी सर्व उमेदवारांची तातडीने बैठक घेतली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. अनेक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत देखील झाली. त्यामुळे आता मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याची उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोलचे निकाल हाती आले असले तरी यामध्ये महायुतीच्या बाजूने काही संस्थांचा निकाल आहे. तर अनेक संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये अटीतटीचा सामना असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीकड़ून 157 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच शरद पवारांनी सर्व उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशाही सूचना दिल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पवार विरुद्ध पवार
बारामतीमध्ये ‘हाय व्होल्टेज’ निवडणूक झाल्याचे दिसून आले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील चुरशीची लढत झाली. तसेच पवार कुटुंबामध्ये लढत झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीमध्ये फक्त राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत नाही तर पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत झाली. आता बारामतीकरांनी कोणाला कौल दिला याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आणि अजित पवार गटाकडून दमदाटी करुन मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटल्या जात आहेत. असा आरोप केला. तर अजित पवार यांनी या आरोपांचे खंडन केले. यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे फक्त राज्याचे नाही तर देशातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.