महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कर्जतमध्ये स्ट्रॉग रुममध्ये भाजप कार्यकर्त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न रोहित पवारांचा आरोप (फोटो - टीम नवराष्ट्र)
कर्जत : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यामध्ये एकूण 65.11 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे निकालाबाबत महायुतीने सकारात्मक विश्वास देखील व्यक्त केला आहे. आता मात्र शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉग रुममध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असले तरी देखील नाट्यमय घडामोडी घडत आहेत. 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान झाले आहे. 4 हजारहून अधिक उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त झाले आहे. त्यामुळे आता ईव्हीएम मशीन व स्ट्रॉग रुमची प्रशासनाकडून पूर्ण तपासणी व काळजी घेतली जात आहे. असे असताना ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये 25 ते 30 कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन खळबळजनक आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे… पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही…, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
भाजपच्या सुमारे २५-३० कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2024
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
उद्या (दि.23) विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व जनतेचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची देखील उत्सुकता लागली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रोहित पवार हे नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर महायुतीचे भाजपचे राम शिंदे यांचे कडवे आव्हान होते. त्यामुळे आता कर्जत जामखेडमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.