ईव्हीएम हॅक आरोपात तथ्य, मी स्वतः इंजिनीअर
अक्कलकोट : रासपाचे उमेदवार सुनिल बंडगर यांना बहुजनाचा आमदार बनवायचं आहे. यासाठी जनतेनी मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार बंडगर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, त्यांना मंत्रिपद देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची जबाबदारी माझी आहे. राज्यात रासपाचे ११७ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भाजपला आमची किंमत दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.
हेदेखील वाचा : “ही भूमी रझाकरांची नव्हे तर छत्रपती शिवरायांची…”; देवेंद्र फडणवीसांनी ओवेसींना आरसा दाखवला
रासपाचे सुनिल बंडगर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने २५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कांदा बाजार अक्कलकोट येथे आयोजित जाहीरसभेत महादेव जानकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजितकुमार पाटील आदी उपस्थित होते. सर्वप्रथम खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून मोटारसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये ५०० मोटरसायकल सहभागी झाले होते. कारंजा चौक येथे महादेव जानकर यांचे क्रेनने हार घालून तसेच फत्तेसिंह चौक येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करुन भव्य स्वागत करण्यात आले.
रॅलीचे रुपांतर जाहीरसभेत झाले. यावेळी बोलताना जानकर म्हणाले की, ‘अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला मतदान करु नका. कारण आम्ही कॉंग्रेसला सत्तेतून हटविण्यासाठी राजू शेट्टी, रामदास आठवले आणि मी महायुतीला समर्थन दिले. त्यांना सत्तेत आणलं पण त्यांनी सत्तेत आल्यावर छोट्या पक्षांना संपविण्याचा कट रचला. आमचे दोन आमदार फोडण्याचे पाप भाजपाने केले आहे. मात्र, यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात ११७ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत’.
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही रासपची भूमिका आहे. पण भाजप आणि कॉंग्रेस यांची दुटप्पी भूमिका आहे. म्हणून ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत आणले तर ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी सत्ते में भागीदारी’ याप्रमाणे वाटा देण्यात येईल, असे जानकर यांनी सांगितले.
रासप यंदाच्या निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका निभावणार
धनगर समाजाला रासपच्या उमेदवारामुळे किंमत दिली जात आहे. जर मी पक्षच काढला नसता तर तुम्हाला कोणीही विचारल नसते असे जानकर म्हणाले. रासपने विधानसभेसाठी २७ जातीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जात आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सुनिल बंडगर यांना निवडून द्या. रासप यंदाच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू
भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून जनतेने परिवर्तन करावे. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सुनील बंडगर यांना निवडून मुंबईला पाठवून द्या. मी या तालुक्याचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन महादेव जानकर यांनी दिले.
हेदेखील वाचा : PM मोदींची हवा संपली, पराभवाच्या भीतीने काँग्रेसवर खोटे आरोप; रमेश चेन्नीथलांचा हल्लाबोल