
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट आखण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दोन शूटर्सना अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून या कटामागील कारण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावर बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या आल्या होत्या. तसेच, दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टलाही लक्ष्य करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईकडे लक्ष वेधले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या शूटर्सची नावे विकास ठाकूर आणि दीपक सिंग अशी आहेत. विकास हा जालंधरचा, तर दीपक तरनतारनचा रहिवासी आहे. हे दोघेही परदेशात बसलेल्या एका गुंडासाठी काम करत असल्याचे सांगितले जात आहे. १९८४ मधील शीख दंगलींसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तपासानुसार, आरोपी विकास ठाकूर हा खंडणीच्या उद्देशाने एका व्यावसायिकावर गोळीबार करण्यासाठी दिल्लीत आला होता. तर दीपक सिंग हा ३ ऑक्टोबर रोजी अमृतसरमध्ये झालेल्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर मद संधू यांच्या हत्या प्रकरणातही पोलिसांना हवा होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबई पोलिसांच्या मदतीने या दोघांना अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. परदेशात राहणाऱ्या एका गुंडाने दीपक सिंगला मुंबईत राहण्यास सांगितले होते. त्याला अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या कटामागील इतर बाबींचाही शोध घेतला जात आहे.