(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Diljit Dosanjh: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या ‘ऑरा इंडिया टूर २०२६’मुळे चर्चेत आहे. नुकताच इंदूरमध्ये त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. मात्र, या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने सादर केलेल्या एका शेरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दिवंगत प्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांच्या शायरीतील ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है’ या ओळी सादर करत त्याने विरोधकांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ खुद्द दिलजीतने सोशल मीडियावर शेअर केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये दिलजीत दोसांझचा ‘ऑरा इंडिया टूर २०२६’ अंतर्गत कॉन्सर्ट पार पडला. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक प्रशासनाने त्याच्या प्लेलिस्टमधील चार गाणी सादर करण्यावर निर्बंध घातले होते. दारू आणि शस्त्रांचा उल्लेख असलेल्या या गाण्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी चिंता बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आयोजकांना ही गाणी कॉन्सर्टमध्ये सादर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या निर्बंधांवर प्रतिक्रिया देताना दिलजीतने मंचावरून प्रेक्षकांशी संवाद साधला. “हे गाता येणार नाही, ते गाता येणार नाही, हे गाता येणार नाही, ते गाता येणार नाही,” असे म्हणत त्याने राहत इंदौरी यांच्या प्रसिद्ध शायरीतील ओळी सादर केल्या. यामध्ये ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है’ या ओळींचाही समावेश होता. त्याच्या या अंदाजाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
View this post on Instagram
दिलजीतच्या कॉन्सर्टचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
दिलजीत दोसांझने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. चार गाण्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांनंतर दिलजीतने शायरीच्या माध्यमातून व्यक्त केलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, दिलजीतच्या इंदूरमधील कॉन्सर्टपूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठालाही अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. या घटनेनंतर न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
दिलजीतने ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील भव्य कार्यक्रमातून आपल्या ‘ऑरा टूर’च्या भारतीय टप्प्याला सुरुवात केली. या कॉन्सर्टमध्ये त्याने ‘G.O.A.T.’, ‘इक कुडी’, ‘ललकारा’, ‘इश्क दी बाजियां’, ‘नैना’, ‘किन्नी किन्नी’, ‘केस’, ‘पंजतारा’, ‘हस हस’ आणि ‘वॉटर’ यांसारखी लोकप्रिय गाणी सादर केली.
या कार्यक्रमातील सर्वात खास क्षण म्हणजे दिलजीतने सादर केलेले ‘साँसों की माला’ हे गाणे. या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता इंदूरमधील कॉन्सर्टमधील त्याचा शायरी सादर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.






