
फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी ६च्या घरात सध्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे वातावरण चांगलेच रंगले आहे. नव्या स्पर्धकांच्या आगमनाने घरातील जुनी समीकरणे ढवळून निघाली असून, आता एक नवीन “सीक्रेट ग्रुप” तयार होणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.
रविवारी ‘भाऊच्या धक्क्या’वर रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके या तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांनी दमदार एन्ट्री घेतली. त्यांच्या येण्याने घरात नवे ट्विस्ट आले असून, विशेषतः प्राजक्ता शुक्रेच्या खेळावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. प्राजक्ताची आतापर्यंतची रणनीती मजबूत मानली जात असली तरी आता नव्या स्पर्धकांमुळे तिला आपली भूमिका बदलावी लागणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
आजच्या भागात प्राजक्ता, रेवा आणि संकेत यांच्यातील संवाद चर्चेचा विषय ठरणार आहे. प्राजक्ताने रेवाला तिची “चावी” घेतल्याबद्दल सांगताना, “मी तुझी चावी घेतली, तुला वाईट वाटलं, पण त्यात तुझीही चूक आहे,” असे स्पष्टपणे म्हटले. त्यावर रेवा म्हणाली की, तिला कोणत्याही ग्रुपमध्ये सामील व्हायचे नाही. मात्र, तिने एक वेगळीच रणनीती सुचवली “ग्रुपचं नाव न देता, कोणालाही न सांगता आपण एकमेकांसोबत उभं राहू शकतो.” या वक्तव्यामुळे घरात एक गुप्त गट तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राजक्ताने रेवाला थेट विचारले की, “तू जे बोलशील तेच करशील का, की तू unpredictable आहेस?” यावर रेवा ठामपणे म्हणाली, “मी जे करेन ते बोलूनच करेन.” या संवादामुळे दोघींमध्ये विश्वास निर्माण होतो का, की हा फक्त गेमचा भाग आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, संकेत पाठकची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. तो या नव्या समीकरणात कोणाच्या बाजूने उभा राहणार, यावर घरातील पुढील खेळ अवलंबून असेल. संस्कृती साळुंकेही शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे तीही पुढे गेममध्ये मोठा ट्विस्ट देऊ शकते. वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील जुने गट कमकुवत होण्याची शक्यता आहे, तर नवीन गट तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी भागांमध्ये रणनीती, मैत्री आणि विश्वासघात यांचा संगम पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे. हा “सीक्रेट ग्रुप” खरोखर तयार होणार का, की सुरुवातीलाच तुटणार? याचे उत्तर पुढील भागांमध्ये मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstarवर पाहता येईल.