
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Govinda On Rani Swarnakar: बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर अभिनेत्री आणि सहकलाकार कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यामुळे तो चर्चेत आहे. २२ सप्टेंबर रोजी गोविंदा आणि कोमल राणी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात एकत्र पोहोचले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कथित नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.
विशेष म्हणजे, गोविंदाच्या दर्शनाच्या काही तास आधी त्याची पत्नी सुनीता आहुजा यादेखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकट्या पोहोचल्या होत्या. त्यामुळे गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा पुन्हा रंगली. मात्र, आता गोविंदाने स्वतः या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत कोमलसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
‘रूपा’साठी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो
गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर सध्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटामुळे एकत्र चर्चेत आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनाबाबत बोलताना गोविंदाने स्पष्ट केलं की, बाप्पाच्या दर्शनाला जाण्यामागे त्याच्या आगामी चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्याचा उद्देश होता.
एएनआयशी बोलताना गोविंदाने सांगितलं की, यापूर्वीही तो करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत मंदिरात गेला आहे. अशा प्रकारे देवदर्शन केल्याचा आपल्या चित्रपटांना चांगला परिणाम झाला आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं त्याने सांगितलं.
गोविंदाच्या म्हणण्यानुसार, तो बराच काळानंतर पुन्हा कामाला सुरुवात करत आहे. त्यामुळे ‘रूपा’ या चित्रपटासाठी त्याने बाप्पाकडे आशीर्वाद मागितले.
लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी कोमल राणी गोविंदासोबत दिसल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या. यावर प्रतिक्रिया देताना गोविंदाने आपल्याविरोधात ‘अत्यंत धोरणात्मक पद्धतीने’ काही गोष्टी केल्या जात असल्याचा दावा केला.
गोविंदाने सांगितलं की, त्याला कुटुंबापासून दूर करणं आणि समाजातील त्याची प्रतिमा खराब करणं हा या सगळ्यामागचा उद्देश असल्याचं त्याला वाटतं. मात्र, आपण कायम आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं असून काम करत राहणं हेच आपलं ध्येय असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
‘हे कोणाच्याही करमणुकीचा विषय नाही’
गोविंदाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली. त्याचं वैयक्तिक आयुष्य हे कोणाच्याही मनोरंजनाचा किंवा चर्चेचा विषय नसल्याचं त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं.
आपण कोमलसोबत व्यावसायिक संबंध ठेवत असून सध्या काम करत असल्याचंही गोविंदाने सांगितलं. त्याच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये अफेअर असलं तरी ते कोणाच्याही चर्चेचा विषय असू नये, असं त्याचं मत आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनापूर्वी गोविंदाने घरीही गणेश चतुर्थी साजरी केली होती. अमेरिकेतून परतल्यानंतर त्याने मुलगी टीना आहुजा आणि मुलगा यशवर्धन आहुजा यांच्यासोबत घरी गणपतीची पूजा केली.
मात्र, या घरच्या गणेशोत्सवाच्या सेलिब्रेशनमध्ये सुनीता आहुजा गोविंदासोबत दिसल्या नव्हत्या. त्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.
‘रूपा’मधून गोविंदाचं कमबॅक
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गोविंदा ‘रूपा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात कोमल राणी स्वर्णकर त्याची सहकलाकार आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोघे एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला आणखी उधाण आलं.
दरम्यान, गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्याचा ‘हीरो की होरोरिन’ हा चित्रपट ७ जानेवारी २०२७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनीता आहुजा, नितांशी गोयल, जेमी लीव्हर, चंकी पांडे, ब्रिजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.