
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Govinda-Sunita Ahuja: बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू होत्या. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्येही चिंता होती. त्यातच सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत मुंबईतील फॅमिली कोर्टाबाहेर दिसल्याने या चर्चांना आणखी उधाण आले होते.
पापाराझींनी सुनीता यांना त्या कोर्टात का आल्या, असा प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्कील अंदाजात, “बर्थडे मनाने आई,” असे उत्तर दिले होते. मात्र, त्यांच्या कोर्टातील उपस्थितीमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा गोविंदा-सुनीता यांच्या नात्याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले.
आता या संपूर्ण प्रकरणावर गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सुनीता आहुजाने गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या तरी या दाम्पत्याचा घटस्फोट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शशी सिन्हा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुनीता यांनी यापूर्वी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती; मात्र हे प्रकरण पुढे गेले नाही. आता त्यांनी कायदेशीररित्या ही केस मागे घेतली आहे.
शशी सिन्हा म्हणाले, “सगळे का घाबरत आहेत? सुनीता जींनी आपली केस परत घेतली आहे. आता घटस्फोट होत नाही, ही आनंदाची बातमी आहे.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही काळापासून गोविंदा आणि सुनीता यांचे वैवाहिक नाते सार्वजनिक चर्चेचा विषय ठरले होते. सुनीता यांनी गोविंदासोबतच्या नात्यावर भाष्य करताना कथितरित्या बेवफाई, धोका आणि विवाहबाह्य संबंधांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला होता. तसेच गोविंदाच्या काही सहकलाकारांसोबतच्या नात्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
यानंतर गोविंदानेही एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली होती. या व्हिडीओमध्ये त्यांनी सुनीता यांना काही गोष्टींबाबत संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे या दोघांमधील मतभेदांची चर्चा आणखी रंगली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता आहुजाने ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील फॅमिली कोर्टात हिंदू विवाह कायदा, १९५५ अंतर्गत गोविंदाविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत कथितरित्या बेवफाई, क्रूरता आणि वेगळे राहणे यांसारख्या कारणांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, आता सुनीताने ही याचिका मागे घेतल्याचे समोर आले आहे.
शशी सिन्हा यांनीही या घडामोडीवर आनंद व्यक्त करत, आता गोविंदा आणि सुनीता यांनी सुखाचा आणि शांततेचा काळ अनुभवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, सुनीता आहुजा पुन्हा एकदा फॅमिली कोर्टात दिसल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचा काहीसा नाराज किंवा गंभीर अंदाज पाहून पुन्हा दोघांमध्ये काही समस्या निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र, शशी सिन्हा यांनी या चर्चांना पूर्णविराम देत दोघांमध्ये सध्या सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. सुनीता कोर्टात दिसल्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. या दाम्पत्याला टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा अशी दोन मुले आहेत.
एकंदरीत, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार गोविंदा-सुनीता यांच्या घटस्फोटाचा अध्याय तूर्तास बंद झाला आहे. मात्र, सुनीता फॅमिली कोर्टात नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या होत्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.