
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Vijayendra Kumeria Divorce: नागिन ४’ आणि ‘उडान’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता विजयेंद्र कुमेरिया सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. विजयेंद्रने सांगितलं की, तो गेल्या चार वर्षांपासून पत्नी प्रीती भाटियापासून वेगळा राहत आहे.
विजयेंद्र आणि प्रीती यांना किमाया नावाची मुलगी असून ती १० वर्षांची आहे. जवळपास दहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. विजयेंद्रने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीला दुजोरा दिला.
विजयेंद्र कुमेरियाने सांगितलं की, तो आणि प्रीती गेल्या चार वर्षांपासून वेगळे राहत आहेत. याआधी २०२३ मध्येही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी प्रीती भाटियाने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला होता. मात्र आता विजयेंद्रने स्वतः याबाबत खुलासा केल्याने त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
विजयेंद्र आणि प्रीती यांची मुलगी किमायाचा जन्म २०१६ मध्ये झाला. प्रीती सोशल मीडियावर मुलगी किमायासोबतचे फोटो अनेकदा शेअर करत असते. २०२४ मध्ये किमायाच्या वाढदिवसानिमित्तही तिने मुलीसोबतचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
दरम्यान, विजयेंद्र आणि प्रीती यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचं समोर आलं होतं.
विजयेंद्र कुमेरियाचा मालिकांमधील प्रवास
विजयेंद्र कुमेरिया हा टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘शास्त्री सिस्टर्स’, ‘उडान’, ‘नागिन ४’, ‘दिवानियात’ आणि ‘जागृती: एक नई सुबह’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. सध्या तो ‘जुही मुई’ या मालिकेत इन्स्पेक्टर श्याम सिंगची भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री ईशा सिंग मुख्य भूमिकेत आहे.
विजयेंद्रच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचा हा खुलासा समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.