
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jay Bhanushali Angry: बिग बॉस २०’ सध्या घरातील वादांमुळे चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये दररोज स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये माही विजने ‘घर तोडणारी’ असा शब्द वापरल्यानंतर लव गिलने मोठा गदारोळ केला. यामध्ये आम्रपाली दुबेही सहभागी झाली. त्यानंतर रोबोट टास्कदरम्यान हा वाद आणखी वाढला. या टास्कमध्ये रोबोटच्या खुर्चीवर बसलेल्या स्पर्धकाला रडवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. माहीला रडवण्यासाठी कनिका मानने तिच्या मुलीचा उल्लेख केला. या प्रकारामुळे माहीचा एक्स पती आणि अभिनेता जय भानुशाली चांगलाच संतापला आहे.
जय भानुशालीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस २०’मधील स्पर्धकांवर नाराजी व्यक्त केली आहे. एका रिअॅलिटी शोमधील भांडणात लहान मुलांना ओढणं चुकीचं असल्याचं त्याने स्पष्ट केलं. इतकंच नाही, तर यापुढे आपल्या मुलांना हा शो पाहू देणार नसल्याचा निर्णयही त्याने घेतला आहे.
जयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली. तो म्हणाला, “माझी मुलं हा शो पाहतात आणि मला त्याबद्दल प्रश्न विचारतात. मी सर्वांना विनंती करतो की, कृपया मला किंवा माझ्या मुलांना या नकारात्मकतेत ओढू नका. मी ही पोस्ट जय भानुशाली म्हणून नाही, तर माझ्या मुलांचा वडील म्हणून लिहित आहे.”
यासोबतच जयने माही विज आणि आपल्या मुलांचा फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली. बिग बॉसच्या घरात माहीच्या खेळावर टीका करण्याचा प्रत्येक स्पर्धकाला अधिकार आहे; मात्र तिच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित करताना मुलीचा उल्लेख करणं त्याला अजिबात मान्य नाही, असं त्याने स्पष्ट केलं.
जयने पोस्टमध्ये लिहिलं, “बिग बॉसमध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एक वडील म्हणून मी निर्णय घेतला आहे की, यापुढे मी माझ्या मुलांना बिग बॉस पाहू देणार नाही. मी ठरवलं आहे की, कोणाच्याही खेळावर भाष्य करणार नाही किंवा कोणत्याही विशिष्ट स्पर्धकाबद्दल माझं मत मांडणार नाही. मात्र, जिथे गरज असेल तिथे माहीला पाठिंबा देईन.”
तसंच, यंग डीएसए आणि कनिका मान यांनी तारा मोठी झाल्यानंतर तिच्या आईच्या वागण्यामुळे तिला लाज वाटेल, अशा आशयाची वक्तव्यं केल्याबद्दलही जयने नाराजी व्यक्त केली.
‘तारा ही ७ वर्षांची मुलगी आहे, बिग बॉसची स्पर्धक नाही!’
कनिका मानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जयने लिहिलं की, कनिकाने माहीच्या मुलांना कधीही भेटण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. तर लव गिलच्या आईनेही या चर्चेत जय आणि माहीच्या मुलीचा उल्लेख केला. एखाद्या रिअॅलिटी शोमधील वादात लहान मुलांना का ओढलं जात आहे, असा सवाल जयने उपस्थित केला.
“तारा ही ७ वर्षांची मुलगी आहे, बिग बॉसची स्पर्धक नाही. एखाद्या लहान मुलाला दुसऱ्याचा अपमान करायला सांगणं हा निव्वळ मूर्खपणा आहे,” अशा शब्दांत जयने आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, जयच्या या पोस्टनंतर ‘बिग बॉस २०’मधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धकांच्या खेळावर आणि वागण्यावर टीका होऊ शकते; मात्र त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांना या वादात ओढणं कितपत योग्य, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.