(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shashank Shende: मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते शशांक शेंडे सध्या त्यांच्या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘अफरातफरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. तीन भावांमधील नातेसंबंध, पैशांचा मोह आणि विम्याच्या रकमेभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करते. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल आणि कथेमागील विचारांबद्दल शशांक शेंडे काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
‘अफरातफरी’ची संकल्पना ऐकल्यानंतरच ती आपल्याला रंजक वाटल्याचे शशांक शेंडे यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी मिलिंद कवडे यांच्यासोबत एका चित्रपटात काम केले होते. त्यांची काम करण्याची पद्धत आवडल्यामुळे या चित्रपटासाठीही त्यांनी लगेच उत्सुकता दाखवली. चित्रपटात एका वृद्ध जोडप्याचे तीन मुलगे एका कठीण परिस्थितीत अडकतात. प्रत्येकाकडे उत्पन्नाचे साधन असूनही पैशांच्या मागे धावताना माणूस आपल्या नात्यांना विसरू लागतो. अगदी जवळच्या माणसांच्या मृत्यूचा विचारही त्यांच्या मनात येऊ लागतो. रक्ताची नाती आणि माणुसकी विसरण्याचा हा पैलू आपल्याला सर्वाधिक महत्त्वाचा वाटल्याचे शशांक यांनी सांगितले.
व्यसनाधीन आणि चुकीच्या व्यवसायात अडकलेल्या भावाची भूमिका
या चित्रपटात शशांक शेंडे मधल्या भावाची भूमिका साकारत आहेत. संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले की, त्यांची व्यक्तिरेखा व्यसनाधीन असून एका कठीण परिस्थितीत अडकलेली आहे. तो चुकीच्या व्यवसायात गुंतलेला असतो. एकदा माणूस चुकीच्या मार्गाला लागला की, तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला आणि इतरांना दोष देत राहतो. त्यांच्या व्यक्तिरेखेचा स्वभावही असाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘अफरातफरी’मध्ये स्लॅपस्टिक नव्हे, तर प्रसंगनिष्ठ विनोद!
चित्रपटातील विनोदाबद्दल बोलताना शशांक शेंडे यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली. ‘अफरातफरी’मध्ये स्लॅपस्टिक विनोद नसून प्रसंगातून निर्माण होणारा विनोद आहे. हा विनोद प्रेक्षकांना हसवतो आणि त्याच वेळी भावुकही करतो. आजकाल विनोदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्याला शिवी दिली तर कदाचित तो शांत बसेल; पण त्याची खिल्ली उडवली तर त्याला ते सहन होणार नाही, ही आपल्या समाजातील वास्तविकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पैशांपेक्षा नाती जपणं महत्त्वाचं!
चित्रपटात तीन भावांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि पैशांमुळे निर्माण होणारे मतभेद पाहायला मिळतात. याबद्दल बोलताना शशांक म्हणाले की, पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे आणि चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल चिंतित आहे. मात्र, पैशांपेक्षा नाती जपणे अधिक महत्त्वाचे आहे. हाच विचार या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
मोहन आगाशे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने यांसारख्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव आणि चित्रपटाबद्दल बोलताना शशांक यांनी हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असल्याचे सांगितले. ‘अफरातफरी’ सध्या मराठी ZEE5 वर पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मनोरंजनासोबतच नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतानाच भावुकही करणार आहे.






