
फोटो सौजन्य - Social Media
मराठी प्रेक्षकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेली जय जय स्वामी समर्थ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. येत्या २० मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता कलर्स मराठी वर प्रसारित होणारा “प्रकट दिन विशेष” भाग हा मालिकेच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. “अध्याय महानिर्वाणाचा” या नावाने सादर होणाऱ्या या भागात भक्ती, संघर्ष आणि दिव्य चमत्कार यांचा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या विशेष भागात गावात पडलेल्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी दाखवण्यात येणार आहे. पाण्यासाठी हवालदिल झालेल्या गावकऱ्यांवर रणजीत सावकार अत्याचार करताना दिसतो. ब्रिटिशांच्या पाठबळावर तो गावातील विहिरीवर हक्क सांगतो आणि गावकऱ्यांना पाणी नाकारतो. हरीश, सुधा, सदाशिव आणि ललिता हे अन्यायाविरोधात उभे राहतात, तर दुसरीकडे स्वामींच्या भक्तांची आर्त हाक वातावरण भारून टाकते.
दरम्यान, स्वामी स्थानावर एक अद्भुत घटना घडत असते. वारुळ हळूहळू वाढत जाऊन फुलाला स्पर्श करण्याच्या दिशेने सरकत असते. सुंदरा आशेने त्या क्षणाची वाट पाहत असते, कारण स्वामींच्या संकेतांनुसार वारुळ फुलाला टेकल्यावरच त्यांचं पुनरागमन होणार असतं. शेवटी निर्णायक क्षणी लोखंडी सुळालाही पालवी फुटते आणि वारुळ फुलाला टेकताच त्यातून तेजोमय प्रकाश प्रकट होतो. त्यानंतर स्वामींचं भव्य आणि दिव्य प्राकट्य घडतं, जो क्षण प्रेक्षकांसाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरणार आहे.
हा भाग केवळ चमत्कारांपुरता मर्यादित नसून अन्यायाविरोधात उभं राहण्याचा आणि सामूहिक शक्तीची जाणीव करून देणारा संदेश देतो. स्वामी शाकंबरी रूपात प्रकट होऊन रणजीतच्या क्रौर्याला शिक्षा देतात आणि भक्तांच्या एकजुटीचं कौतुक करतात. “आम्ही प्रत्यक्ष नसू, तरी आमची कृपा तुमच्या सोबत असेल” हा संदेश देत स्वामी मालिकेला नव्या वळणावर नेतात. “प्रकट दिन विशेष” हा भाग श्रद्धा, संघर्ष आणि दिव्य पुनरागमनाचा नेत्रदीपक अनुभव देणारा ठरणार असून, मालिकेच्या कथानकात नवा टप्पा गाठणार आहे. त्यामुळे हा विशेष भाग चुकवू नका, अशीच प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.