
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेमकी कोणती घटना घडली होती? या घटनेमागचं सत्य काय आणि तिचे अनपेक्षित पैलू कोणते? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता वाढवणारा ‘जय श्री राम’ हा भव्य मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून, एका वेगळ्या विषयाची मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्ये हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.
‘सेव्हन ओशन स्टुडिओज’ आणि ‘अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जय श्री राम’ या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राम खाटमोडे आणि सागर पाठक या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत, तर विनोद वणवे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे चित्रपटाच्या पुढील अपडेट्सकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी
या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण म्हणजे यातील कलाकारांची फळी. मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवी आणि दमदार कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मात्र, या कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. वेगळा विषय, भव्य निर्मितीमूल्ये आणि विविध चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सहभाग यामुळे ‘जय श्री राम’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका अनपेक्षित घटनेवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, ही घटना नेमकी कोणती होती आणि तिच्यामागील कोणते पैलू चित्रपटातून समोर येणार, याबाबत निर्मात्यांनी सध्या तपशील गुलदस्त्यात ठेवले आहेत. त्यामुळे या कथेत कोणती नाट्यमय वळणं पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, त्याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे ‘जय श्री राम’च्या पुढील घोषणांकडे आणि या चित्रपटातून उलगडणाऱ्या कथेकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.