
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
३६५ दिवसांत ३३३ प्रयोग हाऊसफुल्ल
‘अलबत्या गलबत्या’ने अवघ्या ३६५ दिवसांत तब्बल ३३३ प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम केला आहे. याशिवाय एका दिवसात चार, पाच आणि एकाच टीमने तब्बल सहा प्रयोग सादर करण्याची नोंदही या नाटकाच्या प्रवासात झाली आहे. २०२४ मधील वृत्तानुसार, नाटकाने कोविड काळ वगळता सहा वर्षांत ८०० प्रयोगांचा टप्पाही पार केला होता आणि १०००व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू होती.
बालप्रेक्षकांच्या मनोरंजनासोबत मराठी भाषेचे संस्कार
‘अलबत्या गलबत्या’ हे केवळ मनोरंजन करणारे बालनाट्य न राहता बालप्रेक्षकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच मराठी भाषेचे संस्कार घडवण्याचे काम करत आहे. नाटकातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. रंगतदार कथानक, गाणी आणि नाट्यप्रयोगातील मनोरंजन यामुळे या नाटकाने बालप्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
चिन्मय मांडलेकर, रत्नाकर मतकरी, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी या नाटकासाठी गीते लिहिली आहेत. या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत तसेच बालकलाकारांनी आवाज दिला आहे. आता ही गाणी स्वतंत्रपणे बालप्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
या गीतांचे संगीत अनावरण सोमवार, २८ सप्टेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते १०.३० या वेळेत होणाऱ्या नाटकाच्या प्रयोगानंतर हा विशेष सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘अलबत्या गलबत्या’च्या गीतांचे अनावरण करण्यात येणार आहे.
१००० प्रयोगांच्या दिशेने सुरू असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’च्या प्रवासात आता गीतांच्या अनावरणामुळे आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची भर पडणार आहे. जवळपास पाच दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या बालनाट्याचा हा प्रवास मराठी रंगभूमीसाठीही विशेष ठरत आहे.