(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘कलर्स मराठी’ वाहिनी नव्या मराठी वर्षात प्रेक्षकांसाठी नवे आणि आकर्षक मनोरंजन घेऊन सज्ज झाली आहे. ‘मी जिंकून घेईन सारे’ आणि ‘मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी’ या नव्या मालिकांनी दमदार सुरुवात केली आहे. या नव्या प्रवासाला दैवी स्पर्श मिळावा म्हणून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे विशेष अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला.
‘आई तुळजाभवानी’ या लोकप्रिय मालिकेच्या ५०० भागांच्या यशानिमित्त हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन मालिकांच्या नायिका एकत्र देवीच्या दर्शनासाठी आल्या. या सोहळ्यात पूजा काळे (आई तुळजाभवानी), जान्हवी तांबट (छवी) आणि अनघा ठाकूर (मोहिनी) यांनी उपस्थित राहून नव्या प्रवासासाठी देवीचे आशीर्वाद घेतले.
‘मी जिंकून घेईन सारे’ या मालिकेत बाईआजी आणि छवी यांचं नातं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे, तर ‘मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी’ ही मालिका एका स्वप्नाळू मुलीच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगते. दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
(आई तुळजाभवानी मालिका ) पूजा काळे म्हणाली ,“तुळजापूरच्या पवित्र मंदिरात जाऊन आईचं दर्शन घेण्याचा आणि तिच्या साक्षीने प्रार्थना करण्याचा अनुभव माझ्यासाठी शब्दात न मावणारा आहे. त्या क्षणी कलाकार म्हणून नव्हे तर एक श्रद्धाळू म्हणून मन पूर्णपणे भारावून गेलं. डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. त्या दैवी ऊर्जेमुळे ही भूमिका साकारताना अधिक जबाबदारीची जाणीव होते आणि प्रत्येक दृश्य अधिक प्रामाणिकपणे साकारण्याची प्रेरणा मिळते. ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून खूप समृद्ध करणारा प्रवास अनुभवायला मिळतो आहे. या मालिकेत देवीची विविध रूपं साकारताना प्रत्येक वेळेस वेगळी ऊर्जा, वेगळी देहबोली आणि वेगळं भावविश्व उभं करावं लागतं आणि हाच या भूमिकेचा सर्वात मोठा अभिनयात्मक आनंद आहे.
मोहिनी म्हणजेच अनघा ठाकूर म्हणाली , “तुळजापूरला जाऊन आईचं दर्शन घेणं हा माझ्यासाठी खूप शांत आणि सकारात्मक अनुभव होता. नव्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभं असताना मनात अनेक भावना असतात, आणि त्या सगळ्यांना एक वेगळी स्थिरता इथे मिळाली. ‘मोहिनी- प्रेमाची फिल्मी कहाणी’मधील मोहिनीची भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे भावनांनी भरलेली, स्वप्नांनी झपाटलेली आणि आयुष्याशी दोन हात करणारी. या प्रवासाची सुरुवात आईच्या आशीर्वादाने होत असल्यामुळे एक वेगळीच ताकद, ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला आहे.
छवी म्हणजेच जान्हवी तांबट म्हणाली , “आज कलर्स मराठीवरील आम्हां नायिकांना तुळजापूरला जाऊन आईचं दर्शन घेण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूपच विशेष होतं. सेटवर ज्या देवीची भूमिका आपण पाहतो, त्याच मालिकेच्या प्रवासाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मंदिरात जाणं हा खूप भावनिक अनुभव होता. त्या निमित्ताने माझ्या नव्या अभिनय प्रवासाला आईचे आशीर्वाद मिळाले हे मी माझे भाग्य समजते. ‘मी जिंकून घेईन सारं’मधील छवी ही निरागस, मनमोकळी आणि नात्यांना जपणारी मुलगी आहे, आणि या भूमिकेला आईच्या चरणी नतमस्तक होऊन एक वेगळीच ऊर्जा मिळाली.
कलर्स मराठीवर यशस्वी आध्यात्मिक मालिकांच्या यादीत मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या आई तुळजाभवानी मालिकेचे नुकेतच पाचशे भाग पूर्ण झाले असून आई तुळजाभवानी आणि महिषासुर यांच्यातील महायुद्धाची नांदी झाली आहे. सध्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर ही मालिका आहे. बहूप्रतीक्षित महिषासुर मर्दानीचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी आई तुळजाभवानीच्या सामर्थ्य, धैर्य आणि शक्तीची भव्य प्रचिती देणारा ठरणार आहे.
Zubeen Garg यांच्या मृत्यूचं कारण काय? सिंगापूर कोर्टाचा ६ महिन्यांनंतर मोठा निर्णय






