(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेत प्रेक्षकांना एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेतील प्रमुख पात्र समीर परांजपे साकारणारे आरके, चारधाम यात्रेदरम्यान आपल्या आईसाठी प्रचंड चिंता अनुभवतो, कारण ती भूस्खलनात अडकते आणि तिच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. यामुळे आरके पूर्णपणे हतबल होतो. तिच्याशी संपर्क साधण्याचे आणि स्वतः तिथे पोहोचण्याचे त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. आईचं अस्तित्वच अनिश्चित झाल्याने आरके मानसिकदृष्ट्या खचून जातो.या भावनिक वळणामुळे प्रेक्षकांसाठी एपिसोड अधिक रोमांचक आणि हृदयस्पर्शी ठरणार आहे
अशाच अवस्थेत शूटिंगसाठी जात असताना त्याला रस्त्यावर ‘पोतराज’ दिसतो स्वतःलाच फटके मारत असलेला. ते दृश्य पाहून आरकेच्या मनात दडलेली वेदना उफाळून येते. क्षणाचाही विचार न करता तो कारमधून उतरतो, पोतराजच्या हातातील चाबूक घेतो आणि स्वतःलाच फटके मारू लागतो. बंटीच्या नजरेतून दिसणारा हा प्रसंग अत्यंत भावनिक वाटतो जिथे पोतराजच्या रूपातच आरके स्वतःला शिक्षा करताना दिसतो.
या प्रसंगातून आरकेचं आईवरील अतूट प्रेम, असहाय्यता आणि तिच्याबद्दलची काळजी अत्यंत तीव्रतेने व्यक्त होते. भावनांचा हा कळस गाठणारा सीन प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे.
या मालिकेची कथा मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेल्या मोहिनीभोवती फिरते. तिची आई शालिनी ही एका भीषण परिस्थितीतून स्वतःला, मोहिनीला आणि तिच्या होणाऱ्या मुलाला वाचवून आलेली स्त्री आहे. तर महेंद्र हा फिल्म इंडस्ट्रीतील ॲक्शन डायरेक्टर ज्याने शालिनीला आणि तिच्या मुलींना जपलं. अनेक वर्षांनी अभिनेत्री सोनाली पंडित नाईक या मालिकेद्वारे मराठी मालिकांमध्ये 10 वर्षांनी पुनरागमन करत आहेत.






