(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Onkar Bhojane: सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील अनेक कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. यामध्ये अभिनेता ओंकार भोजने याचं नाव आवर्जून घेतलं जातं. ओंकारने ‘हास्यजत्रे’च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर त्याने चित्रपट आणि नाटकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली.
एक काळ असा होता, जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ओंकार भोजनेने अचानक हा शो सोडला. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ओंकारने शो का सोडला, त्यामागे नेमकं काय कारण होतं, असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले होते. आता ओंकारने स्वतः यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
नुकताच ओंकार भोजनेने ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याबाबत भाष्य केलं. त्यावेळी नवीन चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्यामुळे कामाचं शेड्युल सांभाळताना सतत अॅडजस्टमेंट करावी लागत होती, असं त्याने सांगितलं.
ओंकार म्हणाला की, त्यावेळी ‘हास्यजत्रे’ची टीम आताच्या तुलनेत छोटी होती. त्यामुळे वेगवेगळ्या कामांसाठी वारंवार शेड्युलमध्ये बदल करणं त्याला सोयीचं वाटत नव्हतं. सध्या टीममध्ये अनेक पर्याय असल्याने कलाकार एकमेकांशी अॅडजस्ट करून शेड्युल पुढे नेऊ शकतात, असंही त्याने स्पष्ट केलं.
‘एक कामही नीट होत नाही…’
ओंकारने सांगितलं की, या परिस्थितीबाबत तो सातत्याने शोच्या वरिष्ठांशी चर्चा करत होता. शूटिंग संपल्यानंतर रात्री प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन चित्रपटाचं शूटिंग करणं आणि त्यानंतर पुन्हा परत येणं, हे सगळं त्याला जमत नव्हतं.
त्यामुळे त्याने संबंधित सरांशी बोलून काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचानक किंवा कोणाशीही न बोलता घेतलेला नव्हता, तर चर्चा करूनच आपण शोमधून थांबण्याचा निर्णय घेतल्याचं ओंकारने स्पष्ट केलं.
यानंतर त्याने दोन-चार चित्रपटांमध्ये काम केलं.
ओंकारने पुढे सांगितलं की, त्याच्या चित्रपटांचं काम काही काळानंतर पुढे होतं. त्याचदरम्यान त्याला आशिष पाथरे यांचा लोककलेवर आधारित एक शो येत असल्याचं समजलं.
विशेष म्हणजे, हा शो कोणत्या चॅनलवर आहे किंवा त्याचं नाव काय आहे, याचीही त्याला आधी माहिती नव्हती. शोचा टीझर प्रदर्शित झाला, त्याच दिवशी त्याला याबाबत समजल्याचं त्याने सांगितलं.
हा शो जवळपास तीन महिन्यांचा होता आणि तो पूर्ण झाल्यानंतर ओंकार पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कडे वळला.
‘त्यांनी पालकांसारखं सांभाळलं’
ओंकारने यावेळी अमित फाळके आणि गणेश सागडे यांचाही उल्लेख केला. चॅनलच्या वतीने त्यांनी आपल्याला पालकांसारखं सांभाळल्याचं तो म्हणाला.
ओंकारच्या म्हणण्यानुसार, त्या काळातही दोघे त्याच्या संपर्कात होते. संबंधित शो पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा वेळ घे, पण पुन्हा ये, असं त्यांनी त्याला सांगितलं होतं. त्याच्यातील क्षमता काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
त्यानंतर ओंकार पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सहभागी झाला. त्याच्या मते, त्याची पुन्हा झालेली एन्ट्री ही कोणत्याही मोठ्या वादामुळे किंवा नाट्यमय कारणामुळे नव्हती, तर सगळं बोलून आणि समजून घेतल्यानंतर झालेला निर्णय होता.
‘चित्रपट वर्क झाले नाहीत म्हणून परत आलो असं नाही’
ओंकारने आपल्या कमबॅकबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. चित्रपटांमध्ये काम केलं, ते वर्क झालं नाही आणि म्हणून पुन्हा ‘हास्यजत्रे’त आलो, असं अजिबात नाही, असं त्याने सांगितलं.
त्याच्या मते, पुन्हा कार्यक्रमात येण्यामागचं खरं कारण म्हणजे त्याला कॉमेडीच्या प्रक्रियेकडे नव्याने पाहायचं होतं.
कॉमेडीला ‘सीरियस बिझनेस’ म्हटलं जातं, पण त्याचा नेमका अर्थ काय, कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून या प्रक्रियेत कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, याचा विचार करण्याची गरज असल्याचं ओंकारने सांगितलं.
‘कॉमेडीचा सिलेबस अपडेट व्हायला हवा’
ओंकारने पुढे कॉमेडीच्या बदलत्या प्रक्रियेबाबतही भाष्य केलं. एका ठराविक बॅचनंतर कॉमेडीचा ‘सिलेबस’ही अपडेट व्हायला हवा आणि ही प्रक्रिया पुढे नेणं गरजेचं आहे, असं त्याचं म्हणणं आहे.
इतर कामं करत असतानाही या सगळ्या गोष्टींची नोंद आपण मनात एका कोपऱ्यात करून ठेवत असल्याचं त्याने सांगितलं.
‘१०-१५ वर्षांनंतर या गोष्टींच्या नोंदी गरजेच्या’
ओंकारने भविष्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कडे कशा पद्धतीने पाहिलं जाईल, याबाबतही आपला विचार मांडला.
१०-१५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नाव घेतलं जाईल, तेव्हा कॉमेडी करताना कलाकार नेमका काय विचार करत होता, कोणत्या गोष्टी पाळल्या जात होत्या, माणूस म्हणून, कलाकार म्हणून आणि टीम म्हणून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, याच्या नोंदी असणं गरजेचं आहे, असं ओंकारने सांगितलं.
त्यामुळे ‘हास्यजत्रा’ सोडण्याचा निर्णय केवळ चित्रपटांच्या कामासाठी घेतला होता, असं न राहता कॉमेडीच्या प्रक्रियेकडे नव्याने पाहण्याची आणि त्यातून काही शिकण्याची त्याची भूमिका होती, हे त्याच्या या वक्तव्यांतून स्पष्ट होतं






